15 दिवसांत तिरऱ्यांदा आमने-सामने
| दुबई | वृत्तसंस्था |
आतापर्यंत रोलर कोस्टर प्रवास अनुभवणाऱ्या पाकिस्तानने गुरुवारी रंगलेल्या व्हर्च्युअल सेमीफायनलमध्ये बांगला देशचा एकतर्फी धुव्वा उडवला आणि आशिया चषकाच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. या निकालासह आशिया जेतेपदासाठी भारत व पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने भिडणार आहेत. रविवार, दि. 28 रोजी ही ब्लॉकबस्टर फायनल रंगेल. आश्चर्य म्हणजे या 15 दिवसांत भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी आमने-सामने भिडण्याची ही चक्क तिसरी वेळ असेल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील संघर्ष हा जगातील सर्वात जुन्या व तीव्र क्रीडा प्रतिस्पर्धेत गणला जातो. जेव्हा जेव्हा हे दोन्ही संघ आमने-सामने उभे ठाकतात, तेव्हा तो केवळ एक सामना नसून तो इतिहास, भावना आणि अपेक्षा यांचा संघर्ष असतो. आकडेवारीपासून ते सध्याच्या कामगिरीपर्यंत भारताचे पाकिस्तानवर पारडे जड असल्याचे दिसून येते. परंतु हा हायव्होल्टेज सामना असून इथे प्रत्येक षटक आणि प्रत्येक धाव एक नवा इतिहास रचते. 5 फलंदाज, 3 अष्टपैलू, 3 गोलंदाज पाकिस्तानविरुद्ध असा असणार भारताचा संभाव्य संघ असणार आहे. आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानवर भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 16 विश्वचषक सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. यात एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये आठ सामने झाले, जे सर्वच्या सर्व भारताने जिंकले आहेत. टी-20 विश्वचषकात देखील आठ सामने खेळवण्यात आले असून त्यातील 7 सामने भारताने तर 1 सामना पाकिस्तानने जिंकला आहे. टीम इंडियाचे हेच यश आशिया चषकातही दिसून येते.
भारत विरुद्ध पाकिस्तान 1984 पासून आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 16 आशिया चषकांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 18 सामने झाले आहेत. यापैकी 10 सामन्यांमध्ये भारताने, तर 6 सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवला आहे. तर 2 सामने निकाल लागला नाही. एकदिवसीय : 15 सामने भारत विजयी : 8 सामने पाकिस्तान विजयी : 5 सामने निकाल लागला नाही : 2 सामने.टी-20 : 8 सामने भारत विजयी : 7 सामनेपाकिस्तान : 1 सामना. विशेष बाब म्हणजे, दोन्ही संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात कधीही आमने-सामने आले नाहीत. त्यांची गाठ प्रामुख्याने गट किंवा सुपर-4 फेरीत पडली आहे.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.पाकिस्तान (टी-20 संघ) : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हसन अली, हसन नवाझ, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ, सैफ फरीद, सॅम अयुब, सलमान मिर्झा, सफयान मोकीम.
आशिया चषकातील यशस्वी संघ भारत - 8 विजेतेपदे (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018, 2023) श्रीलंका - 6 विजेतेपदे पाकिस्तान - 2 विजेतेपदे. गेल्या पाच वर्षांची स्थितीसप्टेंबर 2020 पासून ते सप्टेंबर 2025 पर्यंत, दोन्ही संघांनी टी-20 स्वरूपात 5 वेळा एकमेकांचा सामना केला आहे. यापैकी भारत 3-2 अशा फरकाने पुढे आहे. ही अलीकडील कामगिरी भारताचा आत्मविश्वास वाढवते.






