श्रीलंकन गोलंदाजासमोर भारताचे लोटांगण

जेफ्री वाँडरसेने घेतले सहा बळी

। कोलंबो । वृत्तसंस्था ।

श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी (दि.4) एकविसीय मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला. कोलंबोला झालेला या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 32 धावांनी पराभव केला. यावेळी भारताच्या संघाने श्रीलंकेच्या जेफ्री वाँडरसेच्या गोलंदाजीवर अक्षरशः लोटांगण घातले होते. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 241 धावांचे आवाहन ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात केली होती. रोहित आक्रमक खेळ दाखवत 44 चेंडूत 64 धावांची अर्धशतकी खेळा केली. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. परंतु, त्यांची भागीदारी 97 धावांची झालेली असतानाच रोहितला जेफ्री वाँडरसेने 14 व्या षटकात बाद केले. यानंतर 18 व्या षटकात वाँडरसेने शुभमन गिललाही 35 धावांवर झेलबाद केले. त्याच षटकात वाँडरसेने शिवम दुबेलाही पायचीत केले. यानंतर वाँडरसनेने विराटलाही 20व्या षटकात 14 धावांवर पायचीत केले. त्यानेच 22व्या षटकातही श्रेयस अय्यरलाही 7 धावांवर पायचीत केले. इतक्यावरच वाँडरसे थांबला नाही, त्याने 24 व्या षटकात केएल राहुलला भोपळाही न फोडू देता त्रिफळाचीत केले. यामुळे भारताची अवस्था 6 बाद 147 अशी झाली होती.

यानंतर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदरने डाव सावरला. त्यांची भागीदारी रंगत असल्याने भारताच्या आशा कायम होत्या. मात्र, 34 व्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने अक्षर पटेलला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत 44 धावांवर बाद केले. त्यानेच 36व्या षटकात 15 धावांवर वॉशिंग्टन सुंदरलाही माघारी धाडले. यानंतर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराजने कसेबसे 200च्या वर भारताला पोहचवले. परंतु, सिराजलाही असलंकाने 4 धावांवर पायचीत करत भारताच्या आशा संपवल्या. 43 व्या षटकात अर्शदीप सिंग धावबाद झाला आणि भारताचा डावही संपला. या सामन्यात श्रीलंकेकडून वाँडरसेने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवत 6 बळी त्याच्या नावावर केले आहेत. या व्यतिरिक्त कर्णधार असलंकाने 3 बळी घेतले.

Exit mobile version