ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ जाहीर

बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धा 2024

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नोव्हेंबरमध्ये होणार्‍या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी दरम्यान भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरूद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

मागच्या काही काळापासून दुखापतीमुळे चर्चेत असलेल्या मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही. याचबरोबर न्युझीलंडविरूद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग असणार्‍या कुलदीप यादवलाही संघातून वगळण्यात आले आहे. तसेच, नुकतेच बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताकडून पदार्पण करणार्‍या नितीश कुमार रेड्डीची बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी निवड झाली आहे. यावेळी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला देखील संधी देण्यात आली आहे. तसेच, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात पर्यायी सलामी फलंदाज म्हणून अभिमन्यू ईश्‍वरनला संधी देण्यात आली आहे.

कुलदीप ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी अनुपलब्ध
कुलदीपने बेंगळुरू येथील न्युझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना खेळला होता. पण भारताला त्या सामन्यात आठ विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता. पुण्यातील दुसर्‍या कसोटी सामन्यात कुलदीपच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी देण्यात आली. यावेळी बासीसीआयने निवेदनात स्पष्ट केले की, कुलदीपला संघातून वगळणे हा रणनीतीचा भाग नसून त्याला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. कुलदीप यादव ऑस्ट्रेलिया दौर्‍याच्या निवडीसाठी अनुपलब्ध होता. कारण त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मांडीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते.
शमीचीदेखील निवड नाही
मोहम्मद शमी घोट्याच्या शस्त्रक्रियेतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीत सुधारणा होऊनही निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड केलेली नाही. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्माने शमीच्या दुखापतीबाबत अपडेट देताना सांगितले होते की, टाचेच्या दुखापतीतून सावरलेल्या शमीच्या गुडघ्याला सूज आली होती, यामुळे तो नव्या मालिकेत भारतीय संघाचा भाग होऊ शकत नाही. गुडघ्याला सूज आल्याने शमीला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही स्थान मिळू शकले नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्‍वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, अ‍ॅडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
Exit mobile version