माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा विश्वास
| माणगाव | प्रतिनिधी |
आपला देश आज हुकूमशाहीच्या दिशेने चालला असून मोदी व भाजप देशाची लोकशाही नामशेष करायला निघाले आहेत. या हुकूमशाही विरोधात उद्धव ठाकरे यांची लढाई असून त्यांना ताकद देण्याचे काम आपण सर्वांनी करायला हवे. मोदी लाट थांबिविण्याची ताकद इंडिया आघाडीमध्ये आहे, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी माणगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव येथे मोतीराम बँक्वेट हॉल रंगमंच याठिकाणी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी अनंत गीते यांनी संवाद साधून मार्गदर्शन केले. या मेळाव्यास महाड नगरीच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदम, उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती नवगणे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, जिल्हा संघटक बळीराम घाग, लोणेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रभाकर ढेपे, नगरसेवक अजित तारळेकर, चंद्रकांत पवार, जिल्हा प्रमुख युवासेना बंटी पोटफोडे, महिला आघाडी प्रमुख तृप्ती गिरासे, स्वाती नलावडे, सौ. सुखदरे, तालुका संपर्क प्रमुख संजय साकले, सीताराम मेस्त्री, समन्वयक विधानसभा महाड रोहित पारधी, सुधीर सोनावणे, अनिल मोरे, बाबू कळंबे, लक्ष्मण महाळुंगे, विश्वंभर दांडेकर, रणजित मालोरे, विभाग प्रमुख गोरेगाव शिवाजी गावडे, वलिद हूर्जुक, भरत देवघरे, आरिफ मणेर, अजिंकेश जाधव यांच्यासह पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गीते पुढे म्हणाले कि, 2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. 17 मे पूर्वी नवीन लोकसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. भाजपने वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. विविध कार्यक्रम भाजप देशात घेत आहे. नुकत्याच मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या 5 राज्यांच्या निवडणूक झाल्या. त्यामध्ये तीन राज्यात भाजप सत्तेवर आली तर तेलंगणाला काँग्रेस व मिझोरामला प्रादेशिक पक्ष सत्तेवर आले. मतदानाची आकडेवारी पहिली तर भाजपला 3 राज्यात मिळालेले मतदान 41 टक्के असून काँग्रेसला मिळालेले मतदान 39.50 टक्के आहे. म्हणजेच फक्त दीड टक्क्याने काँग्रेस मागे पडली. आता यापुढे मोदी लाट थोपविण्याची ताकद आपल्या इंडिया आघाडीत आहे. असे गीते म्हणाले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस आय, शेतकरी कामगार पक्ष हे सर्व इंडिया आघाडीत असून वंचित आघाडी सोबत उद्धव ठाकरे यांचे बोलणे सुरु असून लहान मोठे अनेक पक्ष स्वखुशीने महायुतीच्या हुकूमशाहीला गाडण्यासाठी इंडिया आघाडीत सामील होत आहेत. येणाऱ्या काळात अखंड देशात इंडिया आघाडीची लाट येईल. भाजपचे यश हे अर्ध सत्य असून काँग्रेसचा पराभव हेदेखील अर्ध सत्य आहे. म्हणजेच 59 टक्के सर्वजण एकत्र आले तर भाजप अडचणीत येणार आहे. भाजपचा भुईसपाट झाल्यावर गद्दार पळून जातील. असा टोला गीतेंनी लगावला.
70 वर्ष काँग्रेसची गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता होती. त्यांनी कधीही असे गलिच्छ व नीच राजकारण केले नाही. विरोधक घरे फोडण्याचे काम करीत आहेत. काका-पुतण्याचा वाद सर्वजण पाहत आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यामुळे माझा मार्ग मोकळा झाला. तटकरे 2019 च्या निवडणुकीत मतदारांना सांगायचे गीतेंना मत म्हणजे मोदीला मत आता हेच तटकरे मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेत आता त्यांना तुम्ही मतदान करणार का ? असा सवाल गीते यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला.