। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
हिंदुस्थानच्या पुरुषांच्या संघाने कास्य पदक पटकावल्यानंतर आता आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये हिंदुस्थानच्या खेळाडूंनी पुरुष दुहेरीत दोन कास्य पदके जिंकली. अचांता शरथ कमल-जी साथीयान व मानव ठक्कर-हरमीत देसाई या हिंदुस्थानच्या दोन्ही जोड्यांना उपांत्य फेरीत हार सहन करावी लागली. त्यामुळे दोन्ही जोड्यांना तिसर्या स्थानावरच समाधान मानावे लागले. अन् अंतिम फेरीत पोहचून सुवर्णपदक पटकावण्याचे स्वप्न भंग पावले.
हरमीत देसाई व मानव ठक्कर या हिंदुस्थानच्या जोडीसमोर सेमी फायनलमध्ये दक्षिण कोरियाच्या वूजीन जँग व जोंगहून लीम यांचे आव्हान उभे ठाकले होते. पहिल्या दोन गेममध्ये दक्षिण कोरियाच्या टेटेपटूंनी 11-4, 11-6 अशा फरकाने बाजी मारत आघाडी घेतली. हिंदुस्थानी टेटेपटू त्याचक्षणी लढत गमावणार असे वाटू लागले. पण पुढील दोन गेम्समध्ये मानव ठक्कर व हरमीत देसाई यांनी दबावाखाली खेळ उंचावला व 12-10, 11-9 अशा फरकाने विजय मिळवून 2-2 अशी बरोबरी साधली. पण अखेरच्या गेममध्ये दक्षिण कोरियन टेटेपटूंनी 11-8 अशा फरकाने यश मिळवत अंतिम फेरीचे तिकीट बुक केले.
33 मिनिटांमध्ये खेळ खल्लास
अचंता शरथ कमल व जी साथीयान या हिंदुस्थानच्या सहाव्या सीडेड जोडीला सेमी फायनलमध्ये चमक दाखवता आली नाही. युकीया उडा व शूनसूक तोगामी या जोडीकडून हिंदुस्थानच्या जोडीला 5-11, 9-11, 11-13 अशा फरकाने हार सहन करावी लागली. हिंदुस्थानी जोडीचा 33 मिनिटांमध्येच पराभव झाला.