| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय तिरंदाजांनी गेल्या काही महिन्यांमध्ये केलेल्या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवता आला आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागातील सांघिक प्रकारात पॅरिसचे तिकीट बुक करता आले आहे. जागतिक तिरंदाजी संघटनेकडून ताजी क्रमवारी सोमवारी अपडेट करण्यात आली. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागात भारत पहिल्या स्थानावर विराजमान असल्यामुळे भारतीय तिरंदाजांना ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येणार आहे.
भारताला पुरुष व महिला अशा दोन्ही विभागात ऑलिंपिक कोटा मिळाल्याचा फायदा पुढे होण्याची शक्यता आहे. भारतीय तिरंदाज आता पॅरिस ऑलिंपिकमधील पाचही विभागात आपले कौशल्य आजमावणार आहेत. पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिरंदाजी या खेळामध्ये पाच प्रकारात खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसणार आहेत. पुरुष सांघिक, महिला सांघिक, पुरुष वैयक्तिक, महिला वैयक्तिक व मिश्र अशा पाचही विभागात भारतीय तिरंदाजांना पदक जिंकण्याची संधी असणार आहे.
भारतीय तिरंदाजी संघ पुरुष - तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, प्रवीण जाधव महिला - दीपिकाकुमारी, भजन कौर, अंकिता भकत.