अंतिम सामन्यात अल्कारेज भिडणार मेदवेदेवशी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इंडियन वेल्स ओपन ही टेनिस स्पर्धा सध्या चालू असून पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात 20 वर्षीय अल्कारेजने इटलीच्या यानिक सिनरला पराभवाचा धक्का दिला. यासह स्पेनचा अल्कारेज अंतिम सामन्यात पोहचला आहे. उपांत्य सामन्यात अल्कारेजने पहिला सेट अत्यंत वाईटरित्या पराभूत झाल्यानंतरही दणक्यात पुनरागमन केले आणि पुढील दोन्ही सेट जिंकून अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. अल्कारेजने 1-6, 6-3, 6-2 अशा फरकाने सिनरला पराभूत केले. यासह सिनरची सलग 19 विजयांची मालिका खंडीत झाली. त्याचबरोबर 2024 वर्षात सलग 16 विजयांनंतर सिनर पराभूत झाला आहे. सिनरने 2024 ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपदही जानेवारीमध्ये जिंकले होते.
दरम्यान, या विजयामुळे अल्कारेजने क्रमवारीतील दुसरे स्थानही निश्चित केले आहे. तसेच, अल्कारेज आणि सिनर हे दोघे आत्तापर्यंत 8 वेळा आमने-सामने आले असून आता प्रत्येकी 4 विजयांसह बरोबरी झाली आहे. सामन्यानंतर अल्कारेजने म्हटले की यासारख्या सामन्यात, जेव्हा एक सेट पराभूत झालेला असताना मानसिकरित्या कणखर राहणे महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे पहिला सेट चालू असताना पावसामुळे जवळपास 3 तास हा सामना थांबवावा लागला होता. आता अंतिम सामन्यात अल्कारेजचा सामना डॅनिल मेदवेदेवविरुद्ध होणार आहे. मेदवेदेवने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलला 1-6, 7-6(3), 6-2 अशा फरकाने पराभूत केले आहे. अल्कारेज आणि मेदवेदेव यांच्यातील अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री अडीचनंतर सुरु होणार आहे. महिलांच्या अंतिम सामन्यात पोलंडच्या अव्वल मानांकित इगा स्वियातेक आणि 9 व्या मानांकित ग्रीसच्या मारिया साकारीने प्रवेश केला आहे. या दोघींचा अंतिम सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 11.30 वाजता चालू होणार आहे.







