मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती
। ढाका । वृत्तसंस्था ।
रेणूका सिंग, पूजा वस्त्रकार यांच्यासह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताच्या महिला क्रिकेट संघाने येथे पार पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेश महिला संघावर 44 धावांनी विजय मिळवला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 18 धावांत तीन फलंदाज बाद करणारी रेणूका सिंग ही सामन्याची मानकरी ठरली.
भारताकडून मिळालेल्या 146 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्या बांगलादेशच्या संघाला 20 षटकांत आठ बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार निगार सुल्तानाने 48 चेंडूंमध्ये पाच चौकार व एक षटकाराच्या साहाय्याने 51 धावांची खेळी साकारली; पण इतर फलंदाजांच्या अपयशामुळे बांगलादेशला विजयापासून दूरच राहावे लागले. रेणूका सिंगने 18 धावांमध्ये दिलारा अख्तेर, शोभना मोस्तरी व राबेया खान यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पूजा वस्त्रकारने 25 धावा देत दोन फलंदाज बाद केले. तसेच श्रेयांका पाटील, दीप्ती शर्मा व राधा यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
दरम्यान, याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही; पण प्रत्येकाने छोट्या महत्त्वाच्या खेळी केल्या. स्मृती मानधनाला नऊच धावा करता आल्या. त्यानंतर शेफाली वर्माने 31 धावांची, यास्तिका भाटीयाने 36 धावांची, कर्णधार हरमनप्रीत कौरने 30 धावांची आणि रिचा घोषने 23 धावांची खेळी केली. भारतीय संघाने 20 षटकांत सात बाद 145 धावा फटकावल्या. बांगलादेशकडून राबेया खानने 23 धावा देत तीन फलंदाज बाद केले.