झाकीर हुसेनसह शंकर महादेवन, राकेश चौरसिया यांचा गौरव
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
66 वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा सोमवारी (दि. 5) पार पडला. या सोहळ्यात दिग्गज तबलावादक झाकीर हुसेन, बासरीवादक राकेश चौरसिया, दिग्गज संगीतकार व गायक शंकर महादेवन यांना मानाचा ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा पार पडला. ग्रॅमी अवॉर्ड हा संगीतजगतातील सर्वात मोठा अवॉर्ड मानला जातो.
संगीतकार व ग्रॅमी अवॉर्ड विजेते रिकी केज यांनी याबाबत माहिती दिली. उस्ताद झाकीर हुसेन यांना तीन, तर राकेश चौरसियांनी दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. हे भारतासाठी ग्रॅमी अवॉर्डमधील सर्वोत्तम वर्ष आहे. या क्षणाचं मला साक्षीदार होता आलं, याचा आनंद आहे, असं रिकी केज यांनी म्हटलं आहे.
‘शक्ती’ने ‘दिस मोमेंट’ या अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला. ग्रॅमी अवॉर्ड विजेते रिकी केज यांनी याबाबत माहिती दिली आहे. या अल्बमसाठी चार भारतीय संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले. शंकर महादेवन, सेल्वागणेश विनायकराम, गणेश राजगोपालन, उस्ताद झाकीर हुसेन, असे ते म्हणाले.
