। पॅरिस । वृत्तसंस्था ।
12 वर्षांपूर्वी लंडन ऑलिंपिकमध्ये के. टी. इरफानने 10 वे स्थान मिळविले होते. ही भारतीय अॅथलिटने पुरुषांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत आतापर्यंत केलेली सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. यावेळी यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तीन स्पर्धक असूनही एकालाही पहिल्या 20 स्पर्धकांत स्थान मिळविता आले नाही. महिलांच्या शर्यतीतही प्रियांका गोस्वामीला विशेष कामगिरी करता आली नाही.
अक्षदीप सिंग, विकास सिंग व परमजितसिंग बिश्त हे तिघेही पात्रता पार करून पॅरिसमध्ये दाखल झाले होते, मात्र त्यांना आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या आसपासही पोहोचता आले नाही. प्रसिद्ध अशा आयफेल टॉवर परिसरात झालेल्या या शर्यतीत विकास सिंगला 30 वे, परमजितसिंग बिश्तला 37 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. विकासने ही शर्यत एक तास 22 मिनिटे 36, तर परमजितने एक तास 23 मिनिटे 46 सेकंदात पूर्ण केली.
प्रियांका गोस्वामी 41 वीराष्ट्रकुल व आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्या उत्तर प्रदेशच्या प्रियांका गोस्वामीची 41 व्या स्थानावर घसरण झाली. तिने ही शर्यत एक तास 39 मिनिटे 55 सेकंदात पूर्ण केली. यामुळे ती आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपासून तब्बल 11 मिनिटे दूर राहिली. यात 45 जणींचा सहभाग होता. त्यापैकी दोघींना शर्यत पूर्ण करता आली नाही.