भारताचा फिफा विश्‍वचषकाचा मार्ग खडतर

सुनील छेत्रीच्या गोलनंतरही भारताचा अफगाणिस्तानकडून लाजिरवाणा पराभव

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

फिफा विश्‍वचषकाच्या क्वालिफायर सामन्यात भारताला अफगाणिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. गुवाहाटी येथे मंगळवारी, 26 मार्चला झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने भारताचा 2-1 असा पराभव केला. भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. घरच्या मैदानावर भारताचा पराभव झाल्याने चाहते निराश आहेत. विशेष बाब म्हणजे, भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचा हा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने या खास सामन्यात एक गोलही केला. मात्र असं असतानाही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारताच्या फिफा विश्‍वचषक पात्रता फेरीतील तिसरी फेरी गाठण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.

भारताने सामन्याची सुरुवात शानदार शैलीत केली. आपला 150 वा सामना खेळत असलेल्या छेत्रीने 38व्या मिनिटाला पेनल्टी किकवर भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. भारतीय संघाची आघाडी पूर्वार्धापर्यंत कायम राहिली. मात्र, उत्तरार्धात भारताच्या पदरी निराशा पडली. 70व्या मिनिटाला रहमत अकबरीचा फटका भारतीय बचावपटूला चुकवत गोलरक्षक गुरमीत सिंगला बायपास करत गोलपोस्टमध्ये घुसला. अफगाणिस्तानने 1-1 अशी बरोबरी साधली. यानंतर 88व्या मिनिटाला अफगाणिस्तानला पेनल्टी मिळाली, ज्यावर शरीफ मोहम्मदने गोल करत आपल्या संघाला 2-1 असा विजय मिळवून दिला. घरच्या मैदानावरील पराभवामुळे भारत तीन गुणांपासून वंचित राहिली. विश्‍वचषकाच्या दुसर्‍या पात्रता फेरीत भारताचे आता चार सामन्यानंतर चार गुण झाले आहेत. भारतीय संघाच्या गटात आणखी चार संघ आहेत. या गटात कतार तीन सामन्यांत नऊ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे तीन सामन्यांतून चार गुण आहेत.

भारताला आता आणखी दोन सामने खेळायचे आहेत. यामध्ये घरच्या मैदानावर आशियाई चॅम्पियन कतारविरुद्धचा आणि 6 जूनला कुवेतविरुद्धच्या सामन्याचा समावेश आहे. मात्र, या पराभवामुळे भारताची गुणतालिकेत अफगाणिस्तानपेक्षाही खाली घसरण झाली आहे. पात्रतेची तिसरी फेरी गाठण्यासाठी भारताला उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागतील. भारताला आजपर्यंत कधीही फिफा क्वालिफायरच्या तिसर्‍या फेरीपर्यंत पोहोचू शकलेली नाही. सुनील छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 94 वा गोल केला, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याने सात सामन्यांनंतर गोल केला. यासह त्याच्या नावावर एक अनोखा विक्रमही जमा झाला आहे. छेत्रीने आपल्या 25व्या, 50व्या, 75व्या, 100व्या 125व्या आणि 150व्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये किमान एक गोल केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.

Exit mobile version