भारताचा सामना श्रीलंकेतच होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत यजमान पाकिस्तान असले, तरी त्यांचा भारताविरुद्धचा साखळी सामना श्रीलंकेतच होणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. ही लढत पाकमध्ये व्हावी, यासाठी अखेरपर्यंत सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान होत आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन शहरात आयसीसीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि पाक मंडळाचे कार्याध्यक्ष झाका अश्रफ यांची भेट झाली. त्यात आशिया करंडक स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार भारत-पाक लढत श्रीलंकेतच होणार, अशी माहिती आयसीसीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले अरुण धुमाळ यांनी दिली.

अश्रफ यांनी पाक मंडळाच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी गेल्याच महिन्यात स्वीकारली; पण त्यांच्या अगोदर पदावर असलेल्या नजम सेठी यांना आशिया करंडकाबाबत मान्य केलेले हायब्रिट मॉडेल मान्य नव्हते; परंतु स्पर्धेचा कालावधी आता जवळ आल्यामुळे त्यांनाही मान्यता देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. जय शहा आणि झाका अश्रफ यांची बैठक झाली. त्यात अगोदर निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्पर्धेतले 4 सामने पाकमध्ये; तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत, यात भारत-पाक सामन्याचा समावेश आहे, असे धुमल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

भारत-पाक लढत पाकिस्तानमध्ये होईल, असा दावा पाकचे क्रीडामंत्री एहसान माझारी यांनी केल्याचे वृत्त पाक प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत होते. या सर्व अफवा असल्याचे धुमल म्हणाले. अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाली नाही. भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत पाकमध्ये जाणार नाही, ही बैठक केवळ स्पर्धेच्या कार्यक्रमाला अंतिम मंजुरी देण्यासाठी होती, असेही धुमल म्हणाले.2010 च्या आशिया स्पर्धेतही भारत-पाक सामना श्रीलंकेतील दाम्बुला येथे जाला होता. त्याचप्रमाणे यंदाही होईल, असे त्यांनी सांगितले.

पाक नावापुरताच यजमान
पाकिस्तान केवळ नावालाच या स्पर्धेचे यजमान असणार आहे. त्यांचा दुबळ्या नेपाळविरुद्ध एकमेव सामना त्यांच्या मायदेशात होणार आहे. उर्वरित तीन सामने अफगाणिस्तान-बांगलादेश, बांगलादेश-श्रीलंका आणि श्रीलंका अफगाणिस्तान असे असणार आहेत.

पाकच्या या क्रीडामंत्र्यांना अगोदर काय ठरले आहे, याची माहिती नसावी. आशिया क्रिकेट परिषदेच्या बैठकीत हायब्रिड मॉडेलवर पाक मंडळाचे तत्कालीन कार्याध्यक्ष नजम सेठी यांनी स्वाक्षरी केली आहे. पाकिस्तानमध्ये अंतर्गत काय सुरू आहे, याचा विचार आम्ही करत नाही; परंतु महत्त्वाच्या बैठकांमध्ये काय ठरले आहे, याचा त्यांनी आढावा घ्यावा आणि मग विधान करावे.

अरुण धुमाळ,बीसीसीआय पदाधिकारी
Exit mobile version