कसोटी, एकदिवसीय अन् टी-20च्या क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान
| दुबई | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाने रविवारी न्यूझीलंडवर मात करीत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. तसेच दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या एकदिवसीय व टी-20 क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलिया व भारत यांचे समान रेटिंग (117) आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ताजा गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे, मात्र पहिल्या तीन देशांच्या विजयाच्या टक्केवारीत जास्त फरक नाही. त्यामुळे आगामी काळात देशांच्या क्रमवारीत चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
…तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचणार गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे, पण त्यांच्याकडे पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना त्यांनी जिंकला, तर त्यांना दुसऱ्या स्थानावर पोहोचता येणार आहे. तसेच इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या स्थाानावरही झेप घेता येणार आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिका (अव्वल पाच) 1) भारत (64.58 सरासरी), 2) न्यूझीलंड (60.00), 3) ऑस्ट्रेलिया (59.09), 4) बांगलादेश (50.00), 5) पाकिस्तान (36.66). आयसीसी कसोटी क्रमवारी 1) ऑस्ट्रेलिया (पॉईंट 4345, रेटिंग 117), 2) भारत (पॉईंट 3746, रेटिंग 117), 3) इंग्लंड (पॉईंट 4941, रेटिंग 115), 4) न्यूझीलंड (पॉईंट 2939, रेटिंग 101), 5) दक्षिण आफ्रिका (पॉईंट 2671, रेटिंग 99 रेटिंग). आयसीसी एकदिवसीय क्रमवारी 1) भारत (रेटिंग 121), 2) ऑस्ट्रेलिया (रेटिंग 118), 3) दक्षिण आफ्रिका (रेटिंग 110 रेटिंग), 4) पाकिस्तान (रेटिंग 109), 5) न्यूझीलंड (रेटिंग 102). आयसीसी टी-20 क्रमवारी 1) भारत (रेटिंग 266), 2) इंग्लंड (रेटिंग 256), 3) ऑस्ट्रेलिया (रेटिंग 255), 4) न्यूझीलंड (रेटिंग 254), 5) पाकिस्तान (रेटिंग 249).