भारताचा मालिका विजय

ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव; अश्विन-जडेजाने घेतली फिरकी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 99 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 399 धावांचा डोंगर उभारला होता. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार ऑस्ट्रेलियाला 317 धावांचे सुधारित आव्हान देण्यात आले होते. पण अश्विन-जाडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 217 धावांत आटोपला. डेविड वॉर्नर आणि सीन एबॉट यांनी अर्धशतके ठोकली. इतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. भारताकडून अश्विन-जाडेजा यांनी प्रत्येकी तीन-तीन गडी बाद केले. या विजयासह तीन सामन्याची मालिका भारताने 2-0 ने जिंकली आहे. मोहाली आणि इंदौर एकदिवसीय सामन्यात भारताने बाजी मारली. अखेरचा सामना राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव संघात परतणार आहेत.

भारताने दिलेल्या 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. मॅथ्यू शॉर्ट आणि स्मिथ स्वस्तात तंबूत परतले. शॉर्ट 9 धावांवर बाद झाला, तर स्मिथला खातेही उघडता आले नाही. लाबुशेन आणि वॉर्नर यांनी डाव सावरला. पण तोपर्यंत पावसाने हजेरी लावली. दीड ते दोन तास पावसाने वाया गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाला सुधारित आव्हान देण्यात आले. डकवर्थ लुईस नियमांनुसार, ऑस्ट्रेलियाला 31 षटकांत 317 धावांचे आव्हान देण्यात आले होते.

पावसानंतर खेळाला सुरुवात झाल्यानंतर डेविड वॉर्नर आणि लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ही जोडी अश्विनने फोडली. अश्विनने वॉर्नर आणि लाबुशेन यांना तंबूत धाडले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. एकापाठोपाठ एक फलंदाज तंबूत परतले. डेविड वॉर्नर याने 53 धावांची खेळी केली. तर लाबुशेन याने 27 धावा जोडल्या. ॲलेक्स कॅरी, जोश इंग्लिश, कॅमरुन ग्रीन यांना मोठी खेळी करता आली नाही. अखेरीस सीन एबॉट याने वादळी फलंदाजी करत पराभवाचे अंतर कमी केले. एबॉट याने 54 धावांची खेळी केली. त्याला हेजलवूड याने 23 धावा करुन चांगली साथ दिली.
भारताकडून रविचंद्र अश्विन आणि जाडेजा यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी तीन-तीन गडी बाद केले. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा याने दोन बळी टिपले. मोहम्मद शामीने एक गडी बाद केला.

भारताचे सर्वाधिक षटकार
इंदौर एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विक्रम केला. भारतीय फलंदाजांनी आपल्या डावात तब्बल 18 षटकार मारले गेले. यासोबत भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात 3000 षटकार मारणारा जगातील पहिला संघ बनला. भारताच्या नावावर सध्या 3007 षटकारांची नोंद आहे. भारतीय संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिज हा संघ आहे. त्यांच्या नावावर 2953 षटकार आहेत. तर तिसऱ्या स्थानी पाकिस्तान संघ असून, त्यांच्या नावावर 2566 षटकारांची नोंद आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघ या यादीत चौथ्या स्थानी असून, त्यांच्या नावावर 2486 आणि पाचव्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाच्या नावावर 2387 षटकारांची नोंद आहे. इंग्लंड 2032 आणि दक्षिण आफ्रिका 1947 अनुक्रमे सहाव्या, सातव्या क्रमांकावर आहेत.

Exit mobile version