विश्वचषकातील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात
। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पुन्हा एकदा पाकिस्तानला लोळवले आहे. 120 धावांचे सोपे लक्षही पाकिस्तानला झेपले नाही. एकीकडे पूर्ण सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकलेला असताना भारतीय क्रीडाप्रेमींनी आशा सोडून दिली होती. 14 व्या षटकापर्यंत संपूर्ण सामन्यावर पाकिस्तानची पकड होती. पाकिस्तानने 14 षटकांत 3 गडी गमवून 80 धावा केल्या होत्या. 36 चेंडूत 40 धावांची गरज होती आणि सात गडी हातात होते. अशावेळी भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या भात्यातील अस्त्र बाहेर काढले आणि 15वे षटक जसप्रीत बुमराहच्या हाती सोपवले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने सेट फलंदाज रिझवानचा त्रिफळा उडवला. रिझवानच्या बळी नंतर भारतीय संघ सामन्यात परतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांना डोकं वर काढूच दिले नाही. गडी राखीव असूनही पाकिस्तानला 6 धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले.
दरम्यान, हलक्या पावसाच्या सरींमुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिली गोलंदाजी घेणार हे नक्की होते. संघात चार दर्जेदार वेगवान गोलंदाज असल्याने बाबर आझमने नेमके तेच केले. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा, विराट कोहलीची जोडी सलामीसाठी मैदानात उतरली. शाहीन शाह आफ्रिदीच्या षटकात रोहितने मारलेला षटकार प्रेक्षकांत जाऊन पडला. परंतु, रोहित पुढच्या षटकात झेल देऊन परतला. जम बसवायला थोडा वेळ घेणार्या रिषभ पंतने हारीस रौफला एकाच षटकात तीन चौकार मारल्याने 10 षटकांअखेर भारताच्या खात्यात 81 धावा जमा झाल्या होत्या. भारतीय फलंदाज अडचणीतून मार्ग काढत 140 धावांचा टप्पा गाठणार वाटत असताना मधल्या फळीत पडझड झाली. 3 बाद 89 धावांवरून 7 बाद 96 धावसंख्या झाली. चार फलंदाज पाठोपाठ बाद झाले ज्यात 42 धावा करणारा रिषभ पंतही होता. भारताचे सगळे फलंदाज वेगवान गोलंदाजांना बाद झाले. ज्यात 8 फलंदाज झेलबाद झाले. आणि 19 षटकात भारताचा डाव 119 धावांवर आटोपला.
टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताची ही प्रथम फलंदाजीनंतर तिसरी निचांक धावसंख्या आहे. यापूर्वी 2016 मध्ये 79 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला होतो. टी-20 मध्ये सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाला सर्वच्या सर्व 11 सामन्यांत हार पत्करावी लागलेली आहे. पाकिस्तानने टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारताला सर्वबाद केले आहे.
बुमराह ठरला पाकिस्तानचा कर्दनकाळ न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ सामना जिंकला त्याचा नायक होता जसप्रीत बुमराह. या सामन्यात बूम बूमने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यावरून 120 धावांचे माफक लक्ष्य असतानाही पाकिस्तानी फलंदाज गुडघे टेकताना दिसत होते. जसप्रीत बुमराहने 4 षटकातील 24 चेंडूत केवळ 14 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. विशेष म्हणजे बूम बूमच्या 24 पैकी 15 चेंडू निर्धाव होत्या.
पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात या पराभवामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संकटात आले आहे. ङ्गअफ गटातील हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला आणि आता अमेरिका व भारत प्रत्येकी 4 गुणांसह आघाडीवर आहेत. पाकिस्तानने उर्वरित दोन सामने जिंकून त्यांचे 4 गुण होतील. परंतु, त्याचवेळी त्यांना अमेरिकेच्या उर्वरित दोन सामन्यांत पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. अशावेळी नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल.
