। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
बांगालदेश संघ सध्या भारत दौर्यावर आहे. या दौर्यात बांगलादेश संघ भारताविरुद्ध कसोट मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर आता भारत आणि बांगलादेश संघात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची शनिवारी (दि.28) घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टी-20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार आहे. तसेच, या संघात हार्दिक पांड्याचाही समावेश आहे. याशिवाय काही नव्या चेहर्यांनाही संधी देण्यात आली आहे. यात मयंक यादवला संधी देण्यात आली आहे.
याबरोबरच अभिषेक शर्मा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, जितेश शर्मा, रियान पराग या युवा खेळाडूंनाही भारताच्या संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिंकू सिंग, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, शिवम दुबे असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असणार्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.अ यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनबरोबर जितेश शर्मा हा विदर्भाकडून खेळणार्या खेळाडूचाही पर्याय असणार आहे. दरम्यान, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह अशा खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. याचबरोबर इराणी कप खेळत असल्याने ऋतुराज गायकवाड आणि इशान किशनचा विचार करण्यात आला नसण्याची शक्यता दाट आहे. ऋतुराज इराणी कप स्पर्धेसाठी शेष भारतीय संघाचा कर्णधार आहे. भारत विरुद्ध बांगलादेश टी-20 मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेर, दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्ली तर, तिसरा सामना 12 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे होणार असून सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत.