दिवील-हावरे रस्त्याचे काम निकृष्ट सप्तक्रोशी नागरिकांतून संताप व्यक्त

बांधकाम विभागाचे मात्र दुर्लक्ष
।पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर लोहारे जि.प. गटाला सवाद भाग जोडल्यानंतर दिवील-हावरे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सप्तक्रोशी नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तर, बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
सहा वर्षांपूर्वी या ग्रामस्थांनी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची भेट घेऊन साकडे घातले असता लोहारे ते तुर्भे पुलाच्या उद्घाटनप्रसंगी अनंत गीते यांनी सवाद-हावरे ते दिवील रस्ता आपणच करण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नजीकच्या काळात होणार असताना दिवील ते हावरे रस्त्याचे काम पूर्ण झाले. मात्र, या कामाचा दर्जा अतिशय सुमार असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता व्ही.आर. बागूल अडचणीत येण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
पोलादपूरवासीय दिवीलमार्गे पोलादपूर या तालुक्याच्या शहराशी संपर्कात यावेत, यासाठी स्व. गणपत जंगम गुरूजींनी हयातभर पाठपुरावा केला, तर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी सातत्याने पत्रव्यवहार व अभियंत्यांच्या भेटी घेऊन आग्रह धरला आणि स्व. जंगम गुरूजींच्या पश्‍चात दोन-अडीच वर्षांपासून सवाद आणि हावरे येथील ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहे. सप्तक्रोशीतील जनतेला मात्र या रस्त्याने पोलादपूर तालुक्याचे ठिकाण जवळ येऊनही रस्ता अडीच महिन्यांनी पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यास धुवून जाण्याची शक्यता असल्याचे दिसून आल्याने नाराजी पसरली आहे.
सवाद सप्तक्रोशीतील महाड तालुक्यातील राजेवाडी ते भोर रस्त्यावरील भोराव फाट्यापासून आत असलेल्या धारवली, माटवण, सवाद, कणगुले, कालवली, वावे, हावरे या गावांना भोराव फाटा ते महाड हे अंतर केवळ 10 कि.मी. आणि हावरे ते पोलादपूरपर्यंत 21 कि.मी. असल्याने महाड शहराशी संपर्क ठेवणे सहज आणि पोलादपूर या तालुक्याच्या गावाकडे येण्यासाठी द्राविडी प्राणायाम घालावा लागत असल्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर देवळे जि.प. गटामध्ये असूनही कायम राहिला.
पोलादपूर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे डेप्युटी इंजिनिअर व्ही.आर. बागूल यांना या कामाच्या दर्जाची आणि पूर्ततेची कोणतीही खबर नसल्याने कनिष्ठ अभियंत्यांकडून कोणतीही कामे परस्पर केली जात आहेत काय, असा प्रश्‍न सप्तक्रोशीतील जनतेला पडला आहे.

Exit mobile version