निकृष्ट दर्जाचे काम;बांधकाम विभागाचे मजूरांची देखरेख
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागडात नव्याने निर्माण होणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करतात, प्रकार सातत्याने समोर येतो. उद्धर गोंदाव 10 किमी च्या रस्त्याचे पावणे पाच कोटी निधी वापरून होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या रस्त्याच्या कामात अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन सामाजिक कार्यकर्ते सागर मिसाळ यांनी दाखवून दिले. यावेळी धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे उद्धरकडे जाणार्या या अत्यंत महत्वाच्या रस्त्याच्या कामाची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनिअर अथवा जबाबदार प्रशासकीय अधिकारी उपस्थित नसताना होत आहे. विभागाचे मजूर या कामाची देखरेख व पाहणी करीत आहेत. यावेळी जबाबदार अधिकारी अनुपस्थित असल्याने येथील रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे, असा आरोप सागर मिसाळ व नागरिकांनी केला असून रस्त्याचा दर्जा राखून मजबुतीकरण व डांबरीकरण समाधानकारक न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
उध्दर कुंभारघर महागाव हातोंड गोंदाव ते राममा 548 अ, तालुका सुधागड या रस्त्याचे कामात आवश्यक ते साहित्य वापरले जात नाही, यामध्ये डांबर,खडी हे निकषानुसार वापरले जात नसल्याची बाब समोर आली आहे. सागर मिसाळ व नागरिकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी खड्डा खोदून कामाची पाहणी केल्यास त्या ठिकाणी डांबर आढळून आली नाही. या ठिकाणी केवळ माती व खडी यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मजूर मंगेश शेडगे यांनी मला या कामाची पाहणी व देखरेख करण्यासाठी नेमले असल्याचे सांगितले.
दरम्यान, रस्त्याचे काम अतिवेगाने करण्याचा सपाटा सुरू आहे, त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा होत असून निकृष्ट काम करून जनतेच्या जीवाशी खेळ खेळला जातोय, या मार्गावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक होत असते, त्यामुळे काही दिवसातच या रस्त्याची दुर्दशा पहावयास मिळेल असा संताप आंदोलनकर्ते सागर मिसाळ यांनी व्यक्त केला आहे.
उध्दर-कुंभारघर-महागाव-हातोंड-गोंदाव ते राममा 548 अ, तालुका सुधागड या 10 किमी रस्त्याचे काम सुरू असून यामध्ये रस्त्याचा दर्जा राखण्याचे काम केले जात आहे. मात्र रस्त्याची पुन्हा पाहणी करून काही त्रुटी आढळल्यास ते काम पुन्हा केले जाईल.
संजय वायचळे, उपविभागीय अभियंता पाली सुधागड
सदर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, सार्वजनिक बांधकाम विभागात 9 जागा असून त्यापैकी 3 जागेवर अधिकारी कर्मचारी काम करीत आहेत, त्यामुळे मजुराकडून रस्त्याच्या कामाची देखरेख केली जात आहे.
दिलीप मदने, ज्युनियर इंजिनिअर