। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यात वारंवार लागत असलेल्या वणव्यांमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा धोक्यात आली आहे. रविवारी (दि.9) इंद्रायणी डोंगराला आग लागल्याने हिरवीगार वनसंपदा नष्ट झाली आहे. वनविभागाच्या होणार्या दुर्लक्षितपणामुळे जंगले भस्मसात होण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, इंद्रायणी डोंगरावर तसेच कळंबुसरे, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीच्या वनविभागात आगीने रौद्ररूप धारण केले असताना, येथील पर्यावरण प्रेमींनी आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आगीत गवत जळून गेल्याने गवतावर अवलंबून असणार्या गुरे ढोरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, या वणव्यात झाडे झुडपे, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे वनविभागाने ही बाब गंभीरतेने घेऊन, तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निसर्गप्रेमींकडून बोलले जात आहे.