| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कशेळे येथे झाली. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आ. बाळाराम पाटील यांनी ठाम भूमिका जाहीर करताना पक्षावर नाराज आहेत त्यांना एकदा विचारा, अन्यथा त्यांच्याशिवाय पक्षाची घौडदौड सुरू झालेली असेल, असा निर्वाणीचा इशारा दिला.
शेतकरी कामगार पक्षाच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक कशेळे येथील अक्षदा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व स्वीकारणारे माजी आमदार बाळाराम पाटील, पक्षाचे जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष देवानंद पाटील, तालुका चिटणीस श्रीराम राणे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते तानाजी मते यांनी प्रास्ताविक करताना पक्षाचा कार्यकर्ता हा हाडाचा कार्यकर्ता असताना आपल्या पक्षातील काही कार्यकर्ते पक्षाच्या मीटिंगसाठी जाऊ नये, अशी फोनाफोनी केली जात आहे. पक्ष प्रत्येक गावात पोहोचला असल्याने कर्जत तालुक्यात एक नाही तर दोन जिल्हा परिषद गटाचे उमेदवार निवडून देण्याचे आम्ही आव्हान स्वीकारले आहे.
यावेळी बाळाराम पाटील यांनी, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये फिरावे, तसचे जिल्हा चिटणीस यांनी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणामध्ये भेटी द्याव्यात, अशी सूचना केली. पोलादपुरातील मेळावा हा पक्षासाठी महत्त्वाचा असून, 15 जणांची टीम करून सर्व सहा जिल्हा परिषद गटांमधील कार्यकर्त्यांची कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या कर्जत तालुक्यात पक्षाची घडी पुन्हा बांधण्यासाठी दौरा करा आणि पक्षाची थांबलेली घडी पुन्हा बांधण्याची मोहीम हाती घ्या, असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. पक्षावर जे नाराज आहेत, त्यांना ज्येष्ठ मंडळींनी संपर्क करावा आणि त्या सर्वांना एकदा विचारून घ्या, असे आवाहन बाळाराम पाटील यांनी केले. ज्यांना पक्षासोबत यायचे असेल, त्यांना सोबत घेऊन आणि यायचे नसेल, त्यांच्याशिवाय असा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. पुढील दोन दिवसात दौरा करा आणि पुढील आठ दिवसात अंतिम बैठक घेऊन निर्णय घ्यायचा आहे, असेही पाटील म्हणाले. समाज माध्यमांवर निमंत्रणे देऊन कार्यकर्ते येत नाहीत आणि त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची यादी आमच्याकडे द्या, आम्ही अलिबाग आणि पनवेल कार्यालयातून सर्वांना फोन करून निमंत्रण देऊ, असे बाळाराम पाटील म्हणाले.
जिल्हा चिटणीस सुरेश खैरे म्हणाले की, आजच्या बैठकीचे कारण हे स्पष्ट असून, आपल्याला जिल्ह्यात तालुकानिहाय आघाडी तसेच चिटणीस मंडळ यांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. त्या सर्व आघाड्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कार्यरत करून पक्ष आणखी बळकट करण्यासाठी पक्षाचे धोरण निश्चित करायचे आहे. त्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांकडून जिल्हा परिषद विभागवार दौरा करून त्यांची इच्छा आणि त्यांची त्या त्या भागातील ताकद लक्षात घेऊन समित्यांवरील नावे निश्चित करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात होणार्या निवडणुका लक्षात घेऊन या आघाड्या मदतगार ठरू शकणार आहेत. या सर्व नेमणुका आगामी काळात पोलादपूर येथे होणार्या पक्षाच्या जाहीर मेळाव्यात जाहीर केल्या जातील, असेही खैरे म्हणाले.