। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटन स्थळी माथेरान शहरातील व्यावसायिक, नागरिक, दुकानदार यांनी माथेरान पर्यटन बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीने माथेरान रेल्वे स्थानक ते दस्तुरी नाका या भागात आदिवासी लोकांना व्यवसाय करू देऊ नये अशी मागणी केली आहे. त्याबद्दल प्रशासनाने हस्तक्षेप करून माथेरान शहरात येथील मुलवासी असलेल्या आदिवासी समाजाच्या लोकांना रोजगार करण्याची बंदी येणार नाही यासाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करणारे निवेदन आदिवासी समाजाच्या वतीने कर्जतचे प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आहे. 17 मुद्द्यांवर प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा 18 मार्च पासून माथेरान बंद ठेवण्याचा निर्णय बचाव समितीने घेतला आहे. त्यामध्ये दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन या भागात रस्त्याच्या आणि रेल्वे मार्गाच्या कडेला स्टॉल लावून बसणार्या आदिवासी लोकांचे स्टॉल हटवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
त्या मागणीवर मुलवासी असलेल्या आदिवासी लोकांमध्ये व्यवसाय बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचवेळी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने आदिवासी लोकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे कार्यकर्ते असलेले जैतू पारधी यांनी आदिवासी बचाव जंगल बचाव ही चळवळ हाती घेतली आहे.या चळवळीचे माध्यमातून आदिवासी समाज देखील माथेरान पर्यटन बचाव समितीवर नाराज आहे.
त्याबाबत आदिवासी कार्यकर्ते आणि आदिवासी जनजागृती संस्थेचे अध्यक्ष जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी कर्जत प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. दस्तुरी नाका ते माथेरान स्टेशन या भागात व्यवसाय करून आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करणार्या तसेच आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणार्या लोकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे अशा मुलवासी आदिवासी लोकांच्या व्यवसायावर गदा आणू नका अशी मागणी पारधी यांनी शासनाकडे केली आहे.शासनाने माथेरान पर्यटन बचाव समितींच्या मागणीनुसार व्यवसाय बंद करण्याचे निर्णय घेतल्यास आदिवासी समाज त्या निर्णयाविरूद्ध पेटून उठेल, असा इशारा दिला आहे.