करोडोंचा खर्च करूनदेखील हंडा रिकामाच
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील डावा व उजव्या तीरावर वसलेल्या 26 गावांतील पाण्याचा प्रश्न भीषण होऊ लागला आहे. योजनेसाठी दोन वेळा 60 कोटींहून अधिक रुपये खर्च करूनदेखील या गावांतील महिलांच्या डोक्यावरील हंडा रिकामाच आहे. येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अखेर या महिलांनी पाण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उगारले आहे.
रोहा तालुक्यात 26 गाव पाणी योजना 2013-14 मध्ये कार्यान्वित करण्यात आली. त्यावर सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. 2022-23 मध्ये या योजनेवर 38 कोटी रुपये खर्च करण्यात आले. या योजनेंतर्गत येणारी उजव्या तीरावरील खारापटी, पडम, नडी, भातसई, झोळांबे, कोपरे, लक्ष्मीनगर, शेणवई, डोंगरी, वावे पोटगे, सानेगाव, यशवंतखार, करंजवीरा, दापोली, धोंडखार, तसेच उजव्या तीरावरील खारी, तारेघर, खारगाव, आरे खुर्द, आरे बुद्रुक, कुंभोशी, गोफण, भागीधीखार, लक्ष्मीखार, शेडसई, महादेवखार या गावांतील ग्रामस्थांना भीषण पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
या गावांच्या जवळून कुंडलिका नदी बाराही महिने वाहात आहे. या नदीच्या शुद्ध पाण्याचा स्त्रोत कायमस्वरूपी गावांसाठी उपलब्ध होता. परंतु, या कुंडलिका नदीचे पात्र एमआयडीसीच्या केमिकलयुक्त सांडपाण्याने दूषित झाले आहे. त्यामुळे ते पाणी वापरण्यास अयोग्य आणि आरोग्यास हानिकारक झाले आहे. गावांच्या परिसरात कोणताही पुरेसा स्वच्छ जलसाठा विहीर, तलाव तसेच धरण उपलब्ध नाही. धाटाव येथील एमआयडीसीच्या प्रशासनाने स्वच्छ पाणी पुरविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आश्वासन पाळण्यास ही यंत्रणा अपयशी ठरली आहे. आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक वर्षांपासून 26 गावांतील नागरिकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी कोणताही पाण्याचा स्त्रोत नाही. पाण्याची गरज भागविताना महिलांचे खूप हाल होत आहेत. त्यांच्या डोक्यावरील हंडा रिकामाच असल्याचे चित्र आजही आहे. पाण्यासाठी उन्हातान्हात भटकण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या नावाने एमआयडीसीद्वारे पाणीपुरवठा वितरीत होत असताना हे पाणी नक्की कुठे जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. करोडो रुपये खर्च करूनदेखील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या गावांना मुबलक पाणी देऊ शकत नसल्याने महिलांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
एमआयडीसी विभाग अनभिज्ञ
एमआयडीसीमार्फत दररोज सरासरी 2.2 ते 3 एमएलडी लीटर इतका पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे पाठविला जातो. वितरण व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची असून, जिल्हा परिषदेच्या नावाने या गावांसाठी कनेक्शन घेण्यात आले असल्याची माहिती एमआयडीसी विभागाकडून मिळाली आहे. मात्र, ते पाणी त्यानंतर कुठे जाते याबाबत एमआयडीसी विभाग अनभिज्ञ असल्याची माहिती समोर येत आहे.
उजवा व डाव्या तीरावरील 26 गावांसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. शेवटच्या टोकापर्यंत पाणी येत नाही. स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. परंतु, त्याची पूर्तता करण्यास यंत्रणा उदासीन ठरली आहे.
वीणा कारभारी,
खारापटी
गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची योजना गावात राबविली. परंतु, आजतागायत गावात पाणी नाही. करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र आजही योजनेचा लाभ मिळाला नाही. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उजव्या तीरावरील खारापटी हे सुरुवातीचे गाव आहे. या गावातच पाणी येत नाही. पुढच्या गावांची काय स्थिती असणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. करोडो रुपये खर्च करूनही पाणी नसल्याने कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार सुरू आहे.
मेधा खरीवले,
भातसई
पाण्याची मागणी वाढल्याने एमआयडीसीमार्फत कमी पाणीपुरवठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत 38 कोटी रुपयांची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे काम सुरु आहे.
मुनाफ शेख,
उपअभियंता, एमआयडीसी