देशाच्या विकासात उद्योग व कामगारांचे मोठे योगदान

उपसंचालक एल.के. गोराणे यांचे प्रतिपादन

| खोपोली | प्रतिनिधी |

55 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहानिमित्त खोपोलीजवळील होणाड येथील प्रासोल केमिकल्स लिमिटेड कंपनीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहादरम्यान सुरक्षा जनजागृती, प्रशिक्षण सत्रे, क्रीडा स्पर्धा तसेच कामगारांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले. सुरक्षा सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना 11 तारखेला आयोजित भव्य समारंभात पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला रायगड जिल्हा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक एल.के. गोराणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना गोराणे यांनी देशाच्या विकासात शेती आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी आणि कामगार यांच्या कष्टामुळेच देशाची प्रगती होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रासोल केमिकल्स कंपनीत कामगारांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कामगार व कर्मचाऱ्यांनी सुरक्षा, पर्यावरण आणि आरोग्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उद्योगांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे हे पोलिस प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. प्रासोल कंपनीच्या सामाजिक बांधिलकीबरोबरच सुरक्षा उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी होणाड समूह ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील, साजगाव समूह ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे, कंपनीचे संचालक राहुल श्राप, चेअरमन निशीत शाह तसेच निवृत्त व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ सल्लागार गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी कंपनीच्या प्रगतीबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही कंपनीचे कौतुक केले.

याप्रसंगी सुरक्षा सप्ताहातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या कामगार व कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संपूर्ण सुरक्षा सप्ताह आणि पारितोषिक वितरण सोहळा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विलास पाटील, सतीश ताकवले आणि सचिन प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कंपनीचे ईएचएस प्रमुख व फॅक्टरी मॅनेजर अनिल सी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरक्षा व फायर मॅनेजर दत्ताराम देशमुख, सेफ्टी विभागाची टीम, एचआर विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक संदीप खोपकर व व्यवस्थापक योगेश पाटील यांचे विशेष योगदान लाभले. सर्व विभागप्रमुख, कामगार प्रतिनिधी, कर्मचारी तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे हा सुरक्षा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला

Exit mobile version