नारवेल बेनवले बंदिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे

शेकडो एकर जमिन खार्‍या पाण्याखाली जाण्याची शक्यता
। पेण । संतोष पाटील ।
गेल्या अठवडयात नारवेल बेनवले बंदिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे वृत्त दैनिक कृषीवलने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर ठेकेदाराने काम योग्यप्रकारे सुरु असल्याचा कांगावा केला परंतु पूर्ण काम निकृष्ट दर्जाचे होत आहे हे, पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
बहिराम कोटक येथील प्रयोगशील शेतकरी दयानंद पांडुरंग पाटील यांच्या मत्सशेतीच्या बाजूला असलेल्या बंदिस्तीचे काम गेल्या वर्षी दोन वेळा वाहून गेले. पहिल्यावेळेला मत्स्य शेतीला धोका पोहचू नये म्हणून दयानंद यांनी स्वखर्चाने बांध बांधला त्यानंतर महिना ते दीड महिन्याच्या अवधीत पुन्हा बंदिस्तीला खांड गेली. त्यावेळी तर शेकडो शेतकर्‍यांच्या हितासाठी दयानंद यांनी आपल्या जमिनीतून बांध घालण्याची परवानगी दिली. मात्र ठेकेदाराचा कामाचा दर्जा पाहता पुन्हा एकदा दयानंद याच्या मत्स तलावाच्या बाजूनी असणार्‍या बंदिस्तीला भेगा गेल्या असून, सदरील बंदिस्ती केव्हाही पाण्यामध्ये वाहून जाउ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, जर वेळेवर संभाव्य धोका लक्षात घेउन ठेकेदारानी उपाय योजना केली नाही तर, शेतकरी दयानंद पाटील यांच्या तलावात खारे पाणी शिरले तर लाखोंचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शेकडो एकर जमिन खार्‍या पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने या 17 किलोमीटरच्या खार बंदिस्तीसाठी सुमारे 52 कोटी रुपये निधी उपलब्ध केली आहे. मात्र अधिकारी वर्ग आणि ठेकेदार यांच्या साटेलोटयामुळे व राजकीय वरदहस्तामुळे कामाच्या योग्य दर्जाबाबत मुलाहिजा राखला गेला नाही. ठेकेदाराला वाटले त्याप्रमाणे त्यांनी काम केले. शासनाने घालून दिलेल्या इस्टीमेंटप्रमाणे(अंदाजपत्रक) काम केले गेले नाही. कोणी तक्रार करायला गेल्यास ठेकेदारांच्या माणसांकडून खाकीची भीती घातली जायची व आवाज उठवणार्‍यांचा आवाज दाबला जायचा. त्यामुळे ठेकेदार मन मानेल तसे काम करत आहे. त्यामुळेच वारंवार खारबंदिस्तीला काम पुर्ण होण्याच्या आगोदरच खांडी जात आहेत. तसेच केलेल्या कामामध्ये दगडाची पीचिंग वरच्या थराला मुरुम, पीचिंगच्या बाजूने मुरुम टाकणे गरजेचे असतांना अस केले गेलेले नाही. तसेच ज्या काही ठिकाणी दगड म्हणून वापरले गेले आहे, ते देखील निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या दगडाचाही काही उपयोग झालेला नाही. वर्ल्ड बँकेने खारबंदिस्तीचे काम योग्य प्रकारे व्हावे म्हणून जवळपास 52 कोटींच्या आसपास निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु, या निधीचा योग्य वापर होत नसल्याचे दिसून आले आहे.

ठेकेदाराच्या सुपरवाझरचा जावई शोध
नारवेल बेनवले खारबंदिस्तीचे ठेकेदार प्रथमेश काकडे यांचे सुपरवाझर मुरलीधर बनकर यांनी जावई शोध लावला आहे. भ्रमंन्ती ध्वनीवरून मुरलीधर यांना बहिराम कोटक येथील खारबंदिस्ती खाडीच्या बाजूने सरकल्या बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, तलावाच्या पाण्यामुळे बंदिस्तीला भेगा गेलेल्या आहेत महत्त्वाची बाब म्हणजे खारबंदिस्तीचे काम सुरु होण्या आगोदर पासून दयानंद पाटील यांचे शेततलाव आहेत. मात्र तेव्हा कधीच जुन्या बंदिस्तीला खांडी गेल्या नाहीत मग आता का? तसेच जर बंदिस्तीला तलावामुळे खांडी जात असतील तर बंदिस्ती खाडीच्या बाजूने न सरकता तलावाच्या बाजूने सरकायला हवी होती परंतु आत्तापर्यंत तिनही वेळेला बंदिस्ती ही खाडीच्या बाजूने सरकली आहे याचाच अर्थ बंदिस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

ठेकेदाराच्या खोटया अफवामुळेच लोकप्रतिनिधी कामापासून दूर
जानेवारी महिन्यामध्ये ठेकेदाराकडून अलिबागच्या आमदारांनी पैसे मागितले असल्याचे गौप्यस्फोट पेणचे आमदार रविशेट पाटील यांनी केले आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापले. सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराचा माणूस सुनील पाटील याला उचलून अलिबाग येथे नेले. त्यानंतर वैचारिक राजकीय हल्ले ,प्रति हल्ले झाले आणि त्यामध्ये ठेकेदाराला रान मोकळे मिळाले. ठेकेदार मन मानेल तसे कारभार करु लागला. राजकीय मंडळीने विकास कामाच्या दर्जाकडे लक्ष देणे गरजेचे होते. परंतु ठेकेदाराच्या माणसांकडून चुकीची माहिती पसरवत असल्याने लोकप्रतिनिधींनी या कामापासून दूर राहणे पसंत केले. मात्र याचाच फायदा घेउन आज ठेकेदार राजकीय पुढार्‍यांची नावे सांगुन शेतकर्‍यांना धमकावण्याचे काम करत आहेत. कधी आपण घडयाळाचे असल्याचे सांगतात, तर कधी धनुष्यबाण वाले आमच्या जवळचे आहेत, तर भाजप वाल्यांना सर्व काही पोहचलय असे सांगतात आणि खाकी वाले तर या ठेकेदाराच्या सेवेला फोन केल्यावर हजर असतात त्यामुळेच पुर्ण काम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे.

Exit mobile version