किडरोगाचा आंब्याला धोका

उत्पादनात 90 टक्के घट होण्याची भिती

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

रायगड जिल्ह्यातील अनेक भागात आंब्याला मोहर चांगल्या पध्दतीने आला. मात्र फुल किड रोगामुळे फुलांमधील रस गायब झाले. त्यामुळे यंदा आंब्याच्या उत्पादनात 90 टक्के घट झाल्याचे आंबा उत्पादक शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 14 हजारहून अधिक हेक्टर आंबा लागवडीचे क्षेत्र आहे. त्यामध्ये आंबा उत्पादन देणारे 12 हजार हेक्टर क्षेत्रआहे. आंबा उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक शेतकरी भातशेतीसह आंब्याची लागवड करण्यावर अधिक भर देत आहेत. यंदा आंब्याला मोहर चांगला आला. परंतु नोव्हेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे मोहर गळून पडले. शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी केली. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र मोहरावर फुल किड रोगाचा प्रादुर्भाव जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरु झाला. फुलकिडी मोहरमधील फुलांचा रस शोषून घेऊ लागले. त्याचा परिणाम आंब्याच्या उत्पादनावर झाला. आंबा यंदा चांगला येईल अशी अपेक्षी शेतकर्‍यांना होती. परंतु आंब्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले आहे.

अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत
आंबा काढणीच्या तयारीत होता. शेतकर्‍यांनी फवारणी करून काढणी करण्याच्या कामाला सुरुवात करणार होते. मात्र गेल्या चार दिवसांपासून उरण, कर्जत, खालापूर, पनवेलसह अलिबागमध्येदेखील अवकाळी पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे आंबा काळे डाग लागण्याची भिती निर्माण झाली आहे. बाजारात व्यापार्‍यांकडून आंबे न घेतल्यास शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे. अवकाळीमुळे शेतकरी चिंतेत असल्याचे बोलले जात आहे.

यंदा मोहर चांगला आला होता. परंतु फुल किड रोगामुळे उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन 90 टक्के घटले असून फक्त 10 टक्के उत्पादन आले आहे.

मनोज पाटील
आंबा उत्पादक

आंब्याचे उत्पादन समाधानकारक होते. आंबा काढणीच्या तयारीत असताना अचानक अवकाळी पाऊस जिल्ह्यातील अनेक भागात कोसळला. वार्‍या पावसामुळे आंब्यांना गळती लागली. त्याचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. रुळे, पवेळेसह अनेक गावांमधील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी.

राम पाटील
आंबा उत्पादक
Exit mobile version