दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्ब

सिलेंडर 265 रुपयांनी महागला
मुंबई | प्रतिनिधी |
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता 265 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.
एक ऑक्टोबर रोजी केवळ 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कोलकात्यात 926 आणि चेन्नईमध्ये 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर 915.50 रुपयांना उपलब्ध आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत 1000 रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दिल्लीत आता विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 926 रुपये, मुंबईत 899.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता 915.50 रुपये आहे.

Exit mobile version