रायगडच्या पेट्या बाजारात दाखल
चार ते आठ डझनास पाच हजार ते दहा हजार दर
| नवी मुंबई । प्रतिनिधी ।
वाशीच्या एपीएमसी बाजारात सोमवारी देवगड आणि रायगड हापूस आंब्याच्या तब्बल 125 पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. एपीएमसी बाजारात सध्या हापूसच्या आवक वाढली असून दर मात्र प्रति पेटी 5 हजार ते 10 हजार रुपयांवर स्थिर आहेत. डिसेंबर महिन्यापासून एपीएमसी फळ बाजारात अंजीर, स्ट्रॉबेरी,हापुस आंबा या फळांचा हंगाम सुरू होत असतो. मात्र यंदा बाजारात देवगडचा हापूस उशिराने दाखल होण्यास सुरुवात झाली. अवकाळी पावसाने हापूसच्या हंगामाला विलंब झाला आहे. त्यामुळे बाजारात जादा होत नाही.
मार्चमध्ये हापूसची आवक वाढेल असे मत व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी एपीएमसीच्या बाजारात आलेल्या हापूस आंब्याच्या 125 पेट्या 4 ते 8 डझनाच्या असून 5 हजार ते 10 हजार प्रतिपेटी असा आजच्या तारखेस हापूस आंब्याचा दर बाजारात सुरु आहे. तर रायगड हापूस प्रतिकिलो 100ते 250 रुपयांवर आहेत. मागील तुलनेत सोमवारी बाजारात 100 पेट्या अधिक दाखल झाल्या आहेत. मात्र आवक वाढली असली तरी हापूसचे दर मात्र स्थिर आहेत. मार्च महिन्यात सुरु होणार्या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. मार्चमध्ये जवळ जवळ एक लाख पेट्या दाखल होतात.
सध्या वातावरणात बदल होत असून, कडाक्याची थंडी उष्ण-दमट हवामानाने हापूसच्या उत्पादनाला फटका आहे. त्यामुळे यंदा मार्चमध्ये आवक वाढली तरी 20 एप्रिलनंतर पुन्हा हापूसची आवक कमी होईल. – संजय पिंपळे, व्यापारी