पणत्यांच्या निर्मितेने विशेष मुले झाली प्रकाशमय

सुहित जीवन ट्रस्टचा उपक्रम,कलेला प्रोत्साहन
अलिबाग । वर्षा मेहता ।
विशेष मुलांच्या हातात असणार्‍या कलेला प्रोत्साहन देत त्यांच्याकडून सुंदर अशा कलाकृती निर्माण करुन घेऊन विशेष मुलांनी तयार केलेल्या पणत्या,आकाशकंदिलातून शेकडो कुटुंबे उजळून टाकण्याचे काम पेणमधील सुहित जीवन ट्रस्ट ही संस्था करीत आहे. या प्रयत्नामुळेच या मुलांनी निर्माण केलेल्या वस्तुंनाही चांगली बाजारपेठ मिळू लागली आहे.

सध्यादिवाळीचे वेध सुरु झाले आहेत बाझारात ग्राहकांची खरेदी करण्यासाठी लगबग आहे. कंदील, पणत्या, दिवे, फटाके, रांगोळी अशी दिवाळीशी निगडीत असलेली दुकाने व्यावसायिकांनी उभारली आहेत. या दीपोत्सवात अनेकांना आपली कला दाखवण्याची व लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी मिळते.विशेष मुलांच्या या कलेला व गुणवत्तेला वाव देण्याचा प्रयत्न पेण येथील सुहित जीवन ट्रस्ट कार्यरत आहे.

सुहित जीवन ट्रस्ट ही शासन मान्य संस्था 2004 सालापासून पेण तालुक्यात कार्यरत आहे. या संस्थे अंतर्गत सुमंगल मतिमंद व बहुविकलांग मुलांची शाळा, लाईट हाऊस, स्पेशल टिचर ट्रेनिंग सेंटर, एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि पालवी शीग्र हस्तक्षेप केंद्र असे चार विभाग आहेत. मतिमंद मुलांचे पुनर्वसन करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे. 2004 सालापासून केवळ 10 मुलांना घेऊन संस्था व शाळा सुरु झाली व गेल्या 17 वर्षांत शाळेमधील विद्यार्थ्यांची संख्या 150 हून अधिक झालेली आहे. या मुलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा विषयक उपक्रम राबविण्यात संस्था अग्रेसर आहे. संस्थेमध्ये उरण, पेण तसेच अलिबाग तालुक्यातील 44 गावांमधून विद्यार्थी येत आहेत व अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण, कौशल्ये व व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत.

18 वर्षावरील बौद्धिक अक्षम व्यक्तिंना शाळेमध्ये ठेवता येणे शक्य नसल्यामुळे व त्यांची इतरत्र कुठेही सोय उपलब्ध नसल्याकारणाने संस्थेने 2011-12 यावर्षी एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. सदर व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात 75 प्रौढ व्यक्ति कार्यरत आहेत. हे केंद्र एक प्रकारचा आश्रित कारखाना आहे. ज्यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली बौद्धिक अक्षम व्यक्ति विविध वस्तुंचे उत्पादन करीत असतात. त्यांच्या या उत्पादनांसाठी विविध ठिकाणी उदा. मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, अलिबाग, पेण ई. ठिकाणी विविध प्रदर्शन व विक्री स्टॉल्स लावले जातात व या सुंदर सुबक, आकर्षक वस्तूंची विक्री केली जाते व त्यातील काही मोबदला या विद्यार्थांना दिला जातो, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ सुरेखा पाटील यांनी दिली.

विशेष विद्यार्थ्यांनी मागणीनुसार तयार केलेल्या या सुंदर व आकर्षक दिवाळीच्या दिव्यांना व इतर शोभिवंत सातासमुद्रापलिकडे देखील बरीच मागणी आहे व ती मागणी संस्था यशस्वीपणे पूर्ण करीत आहे. अशा प्रकारे सुबक व सुरेख दिवाळीचे दिवे व इतर सर्व वस्तू तयार करताना विद्यार्थी आपापसात तसेच शिक्षकांसोबत अतिशय आनंदाने उत्साहाने व पूर्ण तन्मयतेने काम करीत असतात.

सुहित जीवन ट्रस्ट संचालित एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुबक व सुरेख दिवाळीचे दिवे विकत घेऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहित करा व संस्थेने हाती घेतलेल्या या जनजागृतीच्या अभिनव उपक्रमामध्ये सहभागी होऊ या, असे आवाहन ट्रस्टकडून करण्यात आले आहे. तसेच दिवाळीचे दिवे विकत घेण्यास या क्रमांकावर संपर्क साधावा 9892191918/9082198148.

कोरोना महामारीमुळे स्टॉल लावणे शक्य नाही पण आमचे विद्यार्थी आणि संस्था हे अनेक वर्षांपासून करत असल्याने आम्ही संपर्क निर्माण केला आहे त्यामुळे आम्हाला फोनवर आणि ईमेलद्वारे ऑर्डर मिळत आहेत. आम्ही शक्य असल्यास वैयक्तिकरित्या जाऊन किंवा कुरिअरद्वारे ऑर्डर पाठवतो.
डॉ. सुरेखा पाटील -संस्थापक-अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट


या वस्तुंची होते निर्मिती
गणपतीच्या मूर्ती,मुषक निर्मिती, पर्यावरण पूरक व रंगबेरंगी राख्या काथ्यापासून पायपुसण्या ,पेपर व कापडी बॅगा,सुबक व सुरेख दिवाळीचे दिव,टाकाऊपासून टिकाऊ वस्तू ,कृत्रिम फुले, फुलांच्या परड्या,फुलांचे गुच्छ ,रंगबेरंगी सुवासिक मेणबत्या,बागकाम व रोपवाटिका तयार करणे, भेटकार्ड ,सुवासिक साबण ,स्वादिष्ट चॉकलेट, पोह्याचे पापड , मिरगुंड, तांदळाचे पापड, शेवया, कुरडया चटण्या, मसाले, हळद. ई.तयार करणे.

Exit mobile version