| खरोशी | वार्ताहर |
पत्रकार दिनाचे औचित्य साधून पेणमधील बौद्धिक अक्षम मुलांच्या सुहित जीवन ट्रस्टच्या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ पेणच्या पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गतिमंद विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुबक वस्तूंना बाजारपेठ मिळून सुहित जीवन ट्रस्टचे नाव सातासमुद्रापार व्हावे, असे आवाहन पत्रकार तथा पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांनी केले.
यावेळी खुद्द गतिमंद मुलांनी बनवलेल्या वस्तूंची भेट देऊन पेणच्या सर्व पत्रकारांचा सन्मान सुहित जीवन ट्रस्टतर्फे करण्यात आला. यावेळी पत्रकार देवा पेरवी, सूर्यकांत पाटील, बाळ सिंगासने, विजय मोकल, सुनील पाटील, कमलेश ठाकूर, राजेश कांबळे, स्वप्निल पाटील, नरेश पवार, अरविंद गुरव, प्रशांत पोतदार, रूपेश गोडीवले, मितेश जाधव, संतोष पाटील, राजेश प्रधान आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देवा पेरवी म्हणाले की, पेणच्या सुबक कलेच्या गणेशमूर्तींमुळे पेणचे नाव सातासमुद्रापलीकडे पोहोचले आहे. याच प्रमाणे सुहीत जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सुबक अशा कलाकुसरीच्या वस्तूंना मोठी बाजारपेठ मिळून या वस्तूही सातासमुद्रापलीकडे जाऊन पेणच्या सुहित जीवन ट्रस्ट व विद्यार्थ्यांचे नाव व्हावे, असे सांगितले.
दरम्यान, सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील व संपूर्ण शिक्षवृंद यांच्या हस्ते पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व पत्रकारांना सुहीत जीवन ट्रस्टच्या सर्व वर्ग खोल्या दाखवून यामध्ये विद्यार्थ्यांकडून करण्यात येणार्या सुबक वस्तूंची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पिशव्या, कापडी पुष्प, शाल, श्रीफळ व वस्तू भेट म्हणुन देण्यात आल्या.
सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शिक्षिका नैनिता पाटील, प्रिती म्हात्रे, प्रियांका ढवळे, दक्षिता काटकर, संजना पाटील, सुरेखा म्हात्रे, प्रतीक्षा म्हात्रे, समिधा वांद्रे, प्रतिभा पाटील, लिनिमा पाटील, अमोल काइनकर, भूषण ढवळे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.