रेल्वे प्रशासनाचा कर्जतकरांवर अन्याय

| कर्जत | वार्ताहर |
रेल्वे प्रशासनाचा कर्जतकर रेल्वे प्रवाशांवर अन्याय डेक्कन एक्स्प्रेसचा अधिकृत थांबा रद्द करुन आरक्षण तिकिटही केले बंद केले आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे देशात हाहाकार माजला गेला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. परंतु, सद्यःस्थितीत काही प्रमाणात निर्बंध शिथिल होऊन जनजीवन सुरळीत होत आहे. परंतु, मध्य रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या महामारीमुळे रेल्वे प्रवाशांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबई पुणे डेक्कन एक्स्प्रेसचा पूर्वीपासून कर्जत रेल्वे स्थानकात अप आणि डाऊनला अधिकृत थांबा होता व आरक्षित तिकीटही कर्जत रेल्वे स्थानकातून दिले जात होते. परंतु, रेल्वे प्रशासनाने अचानकपणे डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत रेल्वे स्थानकातील अधिकृत थांबा रद्द करुन आरक्षित तिकीट देणेही बंद केले. त्यामुळे कर्जत ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या प्रवाशांचे तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
डेक्कन एक्स्प्रेससह इतरही अनेक मेल एक्स्प्रेस गाड्यांचाही रेल्वे प्रशासनाने कर्जत थांबा रद्द केला आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे प्रशासनावर तीव्र नाराज झालेले दिसून येत आहे. तरी, मध्य रेल्वे प्रशासनाने डेक्कन एक्स्प्रेसचा कर्जत थांबा अधिकृतपणे सुरू करुन आरक्षण तिकीटही सुरू करावे व पूर्वीप्रमाणेच सर्व मेल एक्स्प्रेस गाड्यांना कर्जत रेल्वे स्थानकात अधिकृत थांबा द्यावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे प्रवासी आंदोलन करतील, असा इशारा कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन सचिव प्रभाकर गंगावणे यांनी दिला आहे.

Exit mobile version