| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध कठोर कारवाई करत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशाने चार जणांना दोन वर्षांसाठी हद्दपार (तडिपार) करण्यात आले आहे. या कारवाईमुळे कर्जत शहर आणि परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हद्दीत कार्यरत असलेल्या या टोळीविरुद्ध सहा सामाईक गुन्हे, चार स्वतंत्र गुन्हे तसेच 17 अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद आहे. या पार्श्वभूमीवर टोळी प्रमुखासह चार जणांना दोन वर्षांच्या कालावधीसाठी रायगड जिल्ह्यासह लगतच्या पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये सूरज राम जाधव (25) रा. आमराई, ता. कर्जत हा टोळी प्रमुख असून, गणेश सोमनाथ साळुंखे (24), सोहेल सिद्दीकी अन्सारी (25) आणि विकी मारुती जाधव (30) हे त्याचे साथीदार आहेत. या चौघांविरुद्ध कर्जत परिसरात शरीराविरुद्धचे गुन्हे, मारहाण तसेच दहशत निर्माण करणाऱ्या अनेक घटना नोंद झालेल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने आर्थिक फायद्यासाठी तसेच परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने अनेकदा बेकायदेशीर जमाव करून नागरिकांवर हल्ले केले आहेत. कोणी विरोध केल्यास त्याच्यावर आक्रमकपणे हल्ला करून मारहाण करण्याचे प्रकारही सातत्याने घडत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये या टोळीविषयी भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गुन्हेगारांवर यापूर्वी अनेक वेळा अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हेगारी कृत्ये सुरू ठेवली. त्यामुळे त्यांच्यावर कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने रायगड पोलीस प्रशासनाने ही कठोर कारवाई केली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत संबंधित आरोपींना रायगड जिल्ह्यात तसेच लगतच्या पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे कर्जत शहर आणि परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
