तेच धान्य विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार; परवाना रद्द करण्याची मंगेश रावकर यांची मागणी
| रोहा | प्रतिनिधी |
शासनाकडून गरीब कुटुंबातील सदस्यांना कमी दरात वितरीत करण्यात येत असलेल्या रेशनिंग दुकानातील गहू व तांदळाच्या गोणीत चक्क कीटक, किडे आणि मुंग्या सपाडल्या आहेत. आणि तेच गहू, तांदुळ संबंधित दुकानदार ग्राहकांना विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्ते मंगेश रावकर यांनी उघडकीस आणला आहे. तसेच, या दुकानदारांवर कडक कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी देखील त्यांनी तहसील कार्यालयात लेखीपत्राद्वारे केली आहे.
रोहे शहाराला लागून असलेल्या वरसे-भुवनेश्वर येथील रेशनिंग दुकानात गुरुवारी (दि.29) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मंगेश रावकर यांनी दिलेल्या लेखीपत्रात, हे दुकान संजय शर्मा यांच्या एजन्सी मार्फत चालविले जात असल्याची माहिती नमूद केली आहे. तसेच, या दुकानात गहू आणि तांदळाच्या गोणीत आणि भिंतीवर हजारो जिवंत किडे, कीटक फिरत असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस करून सामान्य लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एजन्सी विरोधात कारवाईची मागणी करत परवाना रद्द करण्याची मागणी त्यांनी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी वर्गाकडे केली आहे. परंतु, संबंधित दुकानदारावर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी वर्गाकडून कारवाई होण्याची शक्यता नसल्याने या प्रकरणी अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती मंगेश रावकर यांनी दिली.
या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करून संबंधित दुकानदाराला दुकान स्वच्छ करण्याची व खराब धान्य लाभार्थी व्यक्तींना वाटप न करण्याची ताकीद देण्यात आली आहे. तसेच, गाळा स्वच्छ केल्यानंतर आम्ही परत एकदा दुकानाची पाहणी करणार आहोत, त्याशिवाय धान्य वितरित न करण्याची समज दुकानदाराला देण्यात आली आहे.
हेमलता करसुंगे,
पुरवठा अधिकारी
