प्रकल्पांची सद्य:स्थिती अहवाल शासनाला सादर करणार
। नवी मुंबई । वार्ताहर ।
सिडकोचे विमानतळ, मेट्रो, रेल्वेसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती बुधवारी राज्याच्या सार्वजनिक उप्रकम समितीने घेतली. आमदार डॉ. अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने वाशी येथील एका खासगी हॉटेलमध्ये सिडकोच्या या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला प्रत्यक्षात भेट दिली.
मुंबई विमानतळाला पर्याय ठरू शकेल असा दोन ग्रीनफिल्ड धावपट्टी विमानतळ प्रकल्प सिडको उभारत आहे. हा प्रकल्प राज्याबरोबरच देशासाठी महत्त्वाचा आहे. याचबरोबर सिडको बेलापूर ते पेंदार हा मेट्रो प्रकल्प सुरू करण्याच्या तयारीत आहे. सिडकोचा महागृहनिर्मिती प्रकल्प राज्यात चर्चेचा विषय असून एकाच वेळी 24 हजार घरे बांधली जात आहेत. या प्रकल्पाच्या कंत्राटदारांना 19 हजार कोटी रुपये अदा केले गेल्याने सिडकोची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूखंड विक्री केली जात असून तिजोरी भरण्याला प्राधान्य देण्यात आले आहे.
सिडकोच्या सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची सद्य:स्थिती अहवाल ही समिती राज्य शासनाला सादर करणार आहे. राज्य शासनाच्या या समितीने सिडको मुख्यालयात बैठक न घेता एका खासगी हॉटेलमध्ये घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिडकोने मुख्यालयातील सभागृहात या बैठकीची व्यवस्था केली होती. समितीत एकूण असलेल्या दहा आमदारांपैकी चार आमदार उपस्थित होते.