। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायत मधील जुना कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर आला आहे. तर नव्याने निर्माण केलेल्या कचरा डेपो आणि जुना कचरा डेपो यामधून निघत असलेल्या धुरामुळे नेरळ गावातील रहिवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, पेशवाई रस्त्यालगत असलेल्या पाच एकर जागेवर ग्रामपंचायत नवीन कचरा डेपो बनावट आहे, मात्र त्या ठिकाणी देखील कचर्यावर कोणतीही प्रक्रिया करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. मागील काही महिने नेरळकर कचरा डेपोमधून बाहेर पडणारा कचरा आणि त्या डेपो मधून बाहेर पडणारा धूर यामुळे संतप्त झाले आहेत. जुन्या कचरा डेपोमध्ये कचरा वाहून नेणारी वाहने जात नसल्याने ग्रामपंचायतने नव्याने धरणाच्या खाली कचरा टाकण्यास सुरुवात केली. आता त्या ठिकाणी जाळण्यात येणार्या कचर्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. त्यातून निघणारा धूर यामुळे सर्वत्र साथीचे आजारांचे पेव फुटले आहेत. त्यामुळे शेवटी नेरळ ग्रामपंचायतने पेशवाई रस्त्याच्या बाजूला असलेल्या आपल्या पाच एकर गुरुचरण जमिनीवर कचरा डेपो तयार केला आहे. आता तेथे नेरळ गावातून दररोज गोळा केला जाणारा कचरा नेऊन टाकला जात आहे. मात्र जुन्या कचरा डेपोची समस्या काही सुटण्याचे नाव घेत नाही. आजही रस्त्यालगत असलेल्या जुन्या कचरा डेपोच्या बाहेर कचरा रस्त्यावर येऊ पाहत आहे. मात्र अजूनही नेरळ विकास प्राधिकरणे मंजूर केलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प याचा आरखडा तयार झालेला नाही. कोणत्याही प्रकारचे नियोजन कचर्याबद्दल नेरळ ग्रामपंचायतहकडे नाही. याच नेरळ गावापासून काही अंतरावर असलेल्या माथेरान आणि कर्जत शहरात दररोज तीन ते पाच मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्या कचर्यावर त्या दोन्ही नगरपालिका प्रक्रिया करतात आणि त्या दोन्ही शहरातील कचरा डेपो हे शून्य कचरा डेपो बनले आहेत. त्या दोन्ही शहरांचा आदर्श नेरळ ग्रामपंचायत कधी घेणार? असा प्रश्न समोर येत आहे.