। नागोठणे । वार्ताहर ।
राज्यशासनाने 1 मे 2023 या दिवशी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्याची घोषणा केली होती. राज्यात सर्वत्र हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याच राज्यशासनाच्या स्तुत्य उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा परिवहन मंडळांच्या रोहा आगारा अंतर्गत येणार्या रोहा व नागोठणे बस स्थानकांची राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातून आलेल्या बस स्थानक मुल्यांकन समितीकडून मंगळवारी (दि.16) पाहणी करून आढावा घेत मुल्यांकन करण्यात आले.
दरम्यान, प्रवाशांचे हित लक्षात घेऊन बसस्थानकांच्या स्वच्छतेचे परीक्षण तटस्थपणे करुन त्याचा अहवाल मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांना सादर केला जाणार आहे. मूल्यांकन समितीने दाखविलेल्या त्रुटी दूर करुन बसस्थानके कायम स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने आगार प्रमुखांनी प्रयत्न करायचे आहे, असेही यावेळी विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी सांगितले.