। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मान्सूनपूर्व नालेसफाई कामांचा आढावा 25 मे रोजी आयुक्त गणेश देशमुख यांनी घेतला. चारही प्रभागांतील विविध ठिकाणच्या नाल्यांची पाहणी आयुक्तांनी केली. यावेळी पालिका क्षेत्रात पावसाळ्यात पाणी साठणार्या विविध भागांची माहिती घेऊन ते साठू नये यासाठी अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, संबंधित प्रभाग अधिकारी व मुख्य आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.
पावसाळ्यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये याकरिता पनवेल महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी पनवेल नगरपरिषद हद्दीतील नाल्यांची साफसफाई व ग्रामीण भागांतील नाल्यांची साफसफाईची कामे यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे. सिडको हद्दीतील नाल्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर ताबडतोब चारही प्रभागातील नोलसफाईच्या स्वतंत्र निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामास सुरूवात करण्यात आली आहे.
खारघरमधील नालेसफाईसाठी 180 मनुष्यबळ व 1 पोकलेन, 2 जेसीबी, 2 डंपर, कळंबोली प्रभाग समितीमध्ये 186 मनुष्यबळ व 1 पोकलेन, 1 जेसीबी, वाहतुकीकरीता डंपर, कोमोठे प्रभाग समितीमध्ये 120 मनुष्यबळ व 1 पोकलेन, 1 जेसीबी, वाहतुकीकरिता डंपर संबंधित एजन्सीद्वारे पुरविण्यात आले आहे. पूर्वाश्रमीच्या नगरपरिषद हद्दीमध्ये 150 मनुष्यबळ, 1 पोकलेन,2 जेसीबी, वाहतुकीकरिता आवश्यकतेप्रमाणे डंपर व टेम्पो कंत्राटदारामार्फत पुरविण्यात आले आहे. नालेसफाईची कामे जलदगतीने करण्याकरिता आवश्यतेनुसार वाहने, मनुष्यबळ पुरविण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व नियंत्रण अधिकारीवर्गास दिल्या आहेत.
