। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
हवामान विभागाने यावर्षी भरपूर पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशसक मंगेश चितळे यांनी मान्सूनपूर्व पालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील विविध नाल्यांच्या सफाईची पाहणी करून नुकताच कामकाजाचा आढावा घेतला आहे.
महापालिकेच्या 110 किलोमीटर क्षेत्रात 101 मोठे आणि 2 हजार 104 छोटे नाले असून या महापालिका क्षेत्रात एकूण मोठ्या नाल्यांची संख्या 97 इतकी आहे. यापैकी 68 नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. तर, 2 हजार 104 छोट्या नाल्यांपैकी 1 हजार 262 नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस पण लवकर आल्याने नाले सफाईची सर्व कामे वेगाने पूर्ण होण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी या नाले सफाईची पहाणी केली आहे. या पहाणी दरम्यान खारघरमधील सेक्टर 12, महापौर बंगल्या जवळील नाले, उत्सव चौक, कळंबोली पंप हाऊस व कळंबोली चर्च जवळील नाला अशा सर्व नाल्यांची पहाणी आयुक्तांनी केली आहे.
यावेळी स्वच्छता व घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता संजय कटेकर, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी व कर्मचारी उपस्थित होते.