| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ उप शिक्षक या पदावर कार्य करणाऱ्या शिक्षकांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. याशिवाय आंतरजिल्हा तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, याबाबत जिल्हा शिक्षण विभाग कधी निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती वर्षानुवर्षे रखडली आहे. यामागे शिक्षण विभागातील गलथान कारभार आणि भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. तसेच शिक्षकांना त्यांच्या नियमित कामांसाठीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आर्थिक अपेक्षा असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे शिक्षक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक संकटात सापडले आहेत. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी हे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या कामात लक्ष घालण्याऐवजी पदोन्नती आणि वेतनासंदर्भातील प्रक्रियेत अडथळे निर्माण करीत आहेत. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
28 मार्च 2025 रोजी ग्राम विकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार, प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांपूर्वी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि पदोन्नतीद्वारे मुख्याध्यापक अशी रिक्त पदे भरणे बंधनकारक आहे. मात्र, सध्या ही पदे रिक्त असल्याने शाळांमध्ये प्रशासकीय अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती अर्ज केले आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेची तातडीने अंमलबजावणी करावी. प्रशासनातील रिक्त पदे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक तातडीने भरावीत. शिक्षकांना महिन्याच्या एक तारखेला पगार देण्यात यावेत, अशा मागण्या मांडण्यात आल्या आहेत. तसेच, पदोन्नती प्रक्रियेमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. परंतु या मागण्यांवर जिल्हा परिषद ठोस पावले उचलणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
दिव्यांग शिक्षकांच्या पदोन्नतीचे काम सुरु आहे. उर्वरित शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेचे कामकाज सुरू आहे. मे अखेरपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पदोन्नतीची प्रक्रिया राबविली जाईल.
पुनिता गुरव,
शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद