पावसाळ्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेची तपासणी

| रायगड | प्रतिनिधी |

पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळून अपघात होण्याची आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने संपूर्ण मार्गाची पूर्वपावसाळा तपासणी मोहीम सुरू केली आहे.

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच कोकण रेल्वेच्या मडगाव ते ठोकूर, मडगाव ते रोहादरम्यानच्या भागाची तपासणी केली. रेल्वे रूळ, पूल, बोगदे, कडे, उतार, सिग्नलिंग यंत्रणा, पाणी साचण्याची शक्यता असलेली ठिकाणे, स्थानकावरील पायाभूत सुविधा आणि सौर प्रकाश व्यवस्था यांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. पावसाळ्यापूर्वी पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यंत्रणेची तयारी आणि मूल्यांकन करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर वार्षिक मान्सूनपूर्व तपासणी करण्यात आली.

पावसाळ्यातील आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता असिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा येथे तैनात ठेवण्यात येणार आहेत. लोको पायलट आणि गार्ड यांना वॉकी टॉकी यंत्रणा सज्ज करण्यात येतील. तसेच सॅटेलाईटसारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅनमध्ये सुसज्ज ठेवली जाईल. संवेदनशील ठिकाणे, चालू देखभालीची कामे आणि सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेऊन, तेथे उपाययोजना करण्यात येतील. तसेच बोगद्याजवळ, दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्यात येतील.

कोकण रेल्वेचा मार्ग हा डोंगराळ आणि अतिवृष्टीचा पट्टा असल्यामुळे पावसाळ्यात सुरक्षितता राखण्यासाठी अशी पूर्वपावसाळा तपासणी मोहीम अत्यंत आवश्यक ठरते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि अखंड राहण्यास मदत होते. या तपासणी मोहिमेत रेल्वे मार्गावरील बोगदे, पूल, डोंगर उतार, नाले, आणि रेल्वे मार्गाची सखोल तपासणी केली गेली. कोकण पट्ट्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, पाणी साचणे किंवा रेल्वे मार्ग धोक्यात येणे यासारख्या घटना टाळण्यासाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. रेल्वे मार्गाची मजबुती, दरडी कोसळण्याची शक्यता असलेले डोंगर उतार, पुलांची संरचना आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्यांची पाहणी करण्यात आली, अशी माहिती कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Exit mobile version