| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अकरा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर साखरचौथच्या गणरायाच्या आगमनाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अखेर ही उत्कंठा संपली असून, जिल्ह्यामध्ये मंगळवारी (दि.29) साखरचौथच्या 885 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. त्यात 390 सार्वजनिक व 495 घरगूती गणेशमुर्तींचा समावेश आहे. यावेळी मिरवणूक काढत बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे.
मूर्तीकार मूर्ती तयार करण्यामध्ये मग्न असल्याने गणेशोत्सवामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करता येत नाही. त्यामुळे दहा दिवसांच्या बाप्पाच्या निरोपानंतर साखरचौथच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते, असे काही मंडळींकडून सांगण्यात आले आहे. तसेच, काही ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मित्रमंडळ एकत्र येत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून साखरचौथ गणरायाची मनोभावे पुजा करतात. त्यामुळे साखरचौथ गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा उत्साह वाढू लागला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील हा क्रेझ वाढत आहे. तसेच, दीड दिवसांच्या या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत.
यंदा जिल्ह्यामध्ये 800 हून अधिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना मंगळवारी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी मिरवणूक काढत वाजत गाजत बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे. तर, काही ठिकाणी डोक्यावर आणत पारंपारिक पद्धतीने बाप्पाचे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर विधीवत पुजा झाल्यावर मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. तसेच, दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, साखरचौथच्या बाप्पाच्या स्वागतासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी सोमवारी (दि.28) सायंकाळी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. यावेळी पुजेच्या साहित्यांसह, फुले, फळे सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुल्ल झाल्या होत्या. अलिबागमधी ठिकरूळ नाका येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 17 वर्षाची परंपरा जपली आहे. या मंडळातर्फे दरवर्षी वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यावर्षी येथील महिलांनी एकत्र येत पारंपारिक लेझीमचे सादरीकरण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.






