नोकरीच्या मागे न धावता, उद्योजक बना: प्रा. विजय नवले

| उरण | प्रतिनिधी |

नागाव येथे आयोजित करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात करिअर मार्गदर्शक तथा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स गौरवप्राप्त प्रा. विजय नवले यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत फक्त नोकरीच्या मागे धावण्याऐवजी स्वतः रोजगारनिर्माते बनण्याचे आवाहन केले. MKCL रायगड विभाग व छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नागाव येथील अंगण लॉन येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. नवले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “डॉक्टर, इंजिनिअर किंवा सीए होणे म्हणजेच यश नव्हे. एका क्षेत्रात अपयश आले तरी आयुष्यात अनेक संधी उपलब्ध असतात. जिद्द, आत्मविश्वास आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न यशाकडे घेऊन जातात, असे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तमुळे रोजगार कमी होणार नसून, नव्या संधी निर्माण होणार आहेत. मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घरबसल्या व्यवसाय व सेवा सुरू करता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर रोजगार देणारे बनण्याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी, क्षमता आणि गुण ओळखून त्यांना योग्य दिशा द्यावी, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी सभापती महेश म्हात्रे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. स्पर्धेच्या युगात मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते, असे ते म्हणाले.

माय नॉलेज हब कॉम्प्युटर एज्युकेशन, उरण यांच्या विशेष पुढाकारातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास सभापती महेश म्हात्रे, सल्लागार कोकण विभाग जयंत भगत, डॉ. मोहमीन हसन, राकेश जुगरकर, पत्रकार घनःश्याम कडू, कोशे सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिटकोनच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Exit mobile version