समाज बांधवांकडून जाहीर निषेध
| माणगाव | प्रतिनिधी |
नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागातर्फे समाज भवनाला आर्थिक मदत केली म्हणून आ. भरत गोगावले यांचा मंडळातर्फे सत्कार समारंभ गुरुवारी (दि. 24) ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. जसा कार्यक्रम ठरवला गेला होता, तसा न होता त्यांच्या उलट कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यकमाचे आयोजक मराठा समाज असूनसुद्धा कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्यात आले. आ. गोगवले यांनी यावेळी समाजाला मदत केलेल्या लोकांवर टीका केली. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, असे आवाहन नायक मराठा ज्ञाती मंडळाचे जनरल सेक्रेटरी जनार्दन शिलिमकर यांनी दि.25 ऑक्टोबर रोजी निजामपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला मंडळाचे बोरवाडी विभाग अध्यक्ष अनिल मोरे, शिरवली विभाग सचिव चंद्रकांत पवार, हरेश बागडे, बाबू पोळेकर, मनोज नेमाणे, हरिश्चंद्र धावडे, धोंडू साने, दिलीप पोळेकर, सुधाकर महाडिक, शिवाजी बांदल, सदानंद पानसरे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी पुढे शिलिमकर म्हणाले की, निजामपूर येथे 24 ऑक्टोबरला नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागातर्फे आ. भरत गोगावले यांच्या सत्कार संभारभाचा कार्यक्रम असताना तिथे इमारत, शैक्षणिक किंवा सामाजिक भाषणाऐवजी राजकीय कार्यक्रम करून या कार्यक्रमाचा दुरूपयोग केला गेला. समाजावर उपकार करण्याएवढं नेतृत्व मोठं नसते. समाज आमदार, खासदार बनवत असतो. समाजाचे ऋण त्यांनी फेडायचे असतात. समाज कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही. समाज कोणत्या पक्षाचा बांधील नसतो. वाद निर्माण करणं हे राजकीय लोकांचं काम असत. समाज एकत्र राहणे गरजेचे असते. इतके पैसे देतो, पाठिंबा द्या. एवढा समाज दूधखुळा नाही. समाजाला असे बांधून ठेवण्यापेक्षा तुम्ही दिलेले पैसे परत घ्या. समाज स्वाभिमानी आहे. तो समाज भवन बांधू शकतो. तसेच बाबू-साबुला बघून घेऊ असे भाष्य आ. गोगावले यांनी केले. बाबूशेठ खानविलकर यांनी समाजाला चार लाखांची आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे असे भाष्य करणे अशोभनीय आहे. त्यामुळे समाजात वाद निर्माण होऊन दुरावा होतो. त्यामुळे या वक्तव्याचा आम्ही समाज बांधव जाहीर निषेध करीत असून, आ. गोगवले यांनी माफी मागावी, असे आवाहन यावेळी शिलिमकर यांनी केले.







