थेट तालुका प्रमुखांकडून आमदारांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पुर्तताच होत नसल्याने अलिबागच्या शिवसेना आमदारांकडून जनतेसह शिवसैनिकांचा देखील भ्रमनिरास होत असल्याने नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यातच जनतेची कामे घेऊन जाणारे कार्यकर्ते आपले काम मार्गी लागण्याऐवजी शिव्यांनीच बेजार होत आहेत. त्यामुळे काम नको पण शिव्या आवर असे बोलण्याची वेळ शिवसैनिकांवर आली आहे. त्यात कुर्डूस येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात चक्क तालुकाप्रमुख राजा केणी यांनीच आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करीत पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप करीत कार्यकर्त्यांची कामे होत नसतील तर पक्ष वाढला नाही तरी चालेल असे विधान केल्याने शिवसेनेतील खदखद बाहेर येत असल्याची जोरदार चर्चा आहे.
मोठमोठी आश्वासने देत जनतेची दिशाभुल करीत आमदार झाल्यानंतर मात्र प्रत्यक्षात काहीच कामे होत नसल्याने मतदारांना आश्वासन देणार्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तोंड दाखवणे मुश्किल झाले आहे. कार्यकर्त्यांनाच रोज लोकांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. कामे होत नसल्याने ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत.
कसल्याच कामाचा ठिकाणा नाही. कामांसाठी आमदारांच्या दरबारात मोठया अपेक्षेने जाणार्या जुन्या कार्यकर्त्यांना फक्त आणि फक्त शिव्याच ऐकाव्या लागत आहेत. मी स्वयंभू आहे. मला संघटनेची गरज नाही, वेळ आली तर जिल्हाप्रमुख पद सोडून देईन, असे कार्यकर्त्यांसमोर सुनावले जात असल्याने कट्टर शिवसैनिक दुखावले जात आहेत. जुन्या कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत असून आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी राष्ट्रवादीसोबत पक्षाला जुपले जाणे कार्यकर्त्यांना आवडत नाही. याबाबत शिवसेनेत जोरदार चर्चा सुरु असून स्वतःच्या ताकदीवर लढा देण्यास तयार असणारे शिवसैनिक आमदाराच्या कृतीवर नाराजी व्यक्त करताना दिसतात.
कुर्डूस विभागात नुकतीच शिवसेनेची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तालुकाप्रमुख राजा केणी यांनी आमदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अनेक सवाल केले. लोकसभा, विधानसभेचे चेहरे कुठे दिसतात का, असा सवाल त्यांनी करतानाच पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जात नाही. शिवसेना संघटनेत महत्वपूर्ण भाग असणार्या शाखा प्रमुखाचे काम होत नाही तर जनतेचे काय काम होणार, असा टोला दिला आहे. शाखा प्रमुखाला बाजुला ठेवत परस्पर कामे आमदारांकडून होत असल्याने दुखावलेला शाखाप्रमुख शांत बसत असल्याने पक्षाचे नुकसान होत असल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला आहे. आपली कामे करता येत नसतील तर काय उपयोग असा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी कार्यकर्त्यांना हुरळून जाऊ नका, असा सल्ला देत जुन्या प्रामणिक कार्यकर्त्यांचे काम होत नसेल तर पक्ष न वाढलेला चांगला असेही धक्कादायक विधान केले. त्यामुळे तालुक्यात शिवसेनेत प्रचंड नाराजी असून ती बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.