| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात क्रिकेट खेळत असताना हरवलेला चेंडू शोधताना वीजरोहित्राचा धक्का लागून एक मुलगा जखमी झाल्याची घटना दि. 14 नोव्हेंबर रोजी घडली होती. याबाबत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून कारवाई करावी, अशी मागणी सदर मुलाच्या वडिलांनी केली आहे. यासाठी नेरळ पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले असून, नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
नेरळ गावातील कुंभारआळी भागातील बापूराव धारप सभागृहासमोर महावितरणच्या विजेचे रोहित्र आहे. लागूनच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर क्रिकेट खेळत असताना हरवलेला चेंडू शोधताना 13 वर्षीय मुलगा वीजरोहित्राचा धक्का लागून जखमी झाला. मात्र, सदर मुलगा दीड मिनिटे त्याला चिटकून राहिला अन् जखमी झाला. त्याच्यावर बदलापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीष पाटील असे या बालकाचे नाव आहे. विजेचा धक्का लागलेल्या मुलावर बदलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. या मुलाचे वडील हे दत्तमठामध्ये पुजारी असून, ते मूळचे बदलापूर येथील आहेत. त्यांनी या अपघाताबाबत महावितरणवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. तसेच, संबंधी अधिकारी-कर्मचार्यांवर कारवाई करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, पुन्हा अपघात होऊ नये, यासाठी त्याठिकाणी उपाययोजना करण्याचे त्यांनी सुचवले आहे.