रायगड जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम; निरामय आरोग्य विमा काढण्यासाठी 114 मुलांना अनुदान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दिव्यांग मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने एक नाविन्य उपक्रम हाती घेतला आहे. दिव्यांग कल्याणाच्या पाच टक्के निधीमधून निरायम आरोग्य विमा काढण्यासाठी 144 मुलांना अनुदान जिल्हा परिषदेच्या मार्फत देण्यात आले. जिल्ह्यातील ऑटिझम, सेरेबल पॅल्सी, बौद्धिक अपंगत्व आणि बहुविकलांगता या प्रवर्गातील मुलांसाठी विमा कवच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या अनुदानाचे पत्र प्रातिनिधिक स्वरूपात 9 मुलांना बुधवारी (दि.18) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते अलिबाग येथे वाटप करण्यात आले. 2024-25मध्ये 105 लाभार्थ्यांना हे अनुदान देण्यात आले होते.
राष्ट्रीय न्यास, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग भारत सरकार यांनी ऑटिझम, सेरेब्रल पॅल्सी, बौद्धिक अपंगत्व आणि बहुविकलांगता असलेल्या व्यक्तींसाठी सुरू केलेली निरामय आरोग्य विमा योजना वार्षिक एक लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कव्हर देते. या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधून नावनोंदणी करता येते. अनेकवेळा दिव्यांग व्यक्तींना अथवा दिव्यांग मुलांच्या पालकांना विमा योजनेसाठी रक्कम भरणे शक्य नसते. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. वाटप कार्यक्रमासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सहाय्यक सल्लागार साईनाथ पवार यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
निरामय आरोग्य विमा योजनेमध्ये शस्त्रक्रिया रू. 55 हजार, ओपीडी (नियमित वैद्यकीय तपासणी) रू.15 हजार, दंतचिकित्सेसाठी रू.4 हजार, थेरपीसाठी रू. 20 हजार, पर्यायी औषधांसाठी रू.4 हजार आणि आपत्कालीन वाहन खर्च रू. 2 हजार असे एकूण वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड, आधारकार्ड, बँक खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ देशभरातील कोणत्याही प्रकारच्या रूग्णालयात घेता येतो अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.
