कामगार संघटनेचा इशारा
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे शेतकर्यांच्या जमिनी घेऊन निटको कंपनीचे मालक विवेक तलवार यांनी 27 जानेवारी 2020 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीला टाळे ठोकले आणि रातोरात 300 कर्मचारी रस्त्यावर आले. 27 जानेवारी रोजी कंपनीला दोन वर्षे झाल्याच्या निषेधार्थ कामगारांनी तीव्र निषेध व्यक्त केला होता.
यासंदर्भात मुंबई येथे कोकण विभागाच्या कामगार सहआयुक्त श्रीमती लोखंडे यांच्या कार्यालयात निटको लिमिटेड अलिबाग यांची बैठक पार पडली. यावेळी कंपनीचे मालक एम.डी. विवेक तलवार, कामगार संघटनेच्यावतीने सल्लागार अॅड. नितीन शिवकर, साधुराम मालुसरे, दीपक रानवडे, खराडे, निटको टाईल्स कामगार संघटनेचे अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी कंपनीची टाळेबंदी व कामगारांना योग्य दराने कायदेशीर मोबदला व सानुग्रह अनुदान या विषयांवर चर्चा झाली. मात्र कंपनीचे मालक विवेक तलवार यांनी आर्थिक मोबदला बाबत दिलेला प्रस्ताव खूपच कमी असल्याने तो कामगार संघटनेला मान्य नसल्याचे सांगण्यात आले.
यासंदर्भात पुढील आठवड्यात पुन्हा कामगार सहआयुक्त यांचेकडे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव ती मिटिंग पुढे ढकलण्यात आली. त्यावेळी योग्य तोडगा निघू शकेल असा अंदाज कामगार संघटनेने व्यक्त केला आहे . मालकाने नकारात्मक भूमिका घेतल्यास नाईलाजास्तव तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल,असा कामगार संघटने ने इशारा दिला आहे.