अलिबाग-रोहा-मुरूडमधील रस्त्यांना खड्डे
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-रोहा तसेच अलिबाग-रेवदंडा-मुरूड मार्गावरील रस्ते चांगले होतील, या विश्वासाने मतदारांनी आ.दळवींना निवडून दिले. परंतु त्यांनी मतदारांची घोर निराशा केली आहे. अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. धुळीचा प्रचंड त्रास प्रवाशांना होत आहे. परिणामी, गेल्या पाच वर्षात केवळ आश्वासनांची उधळण करणार्या आ. दळवींना आमदारकीची वाट बिकट असून त्याचा फटका या निवडणूकीत बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडून आल्यावर स्वतःच्या खर्चातून रस्त्याचे काम करेन, असे आश्वासन आमदार महेंद्र दळवी यांनी मते मिळविण्यासाठी दिले होते. निवडून आल्यावर मोठा गाजावाजा करीत अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. अनेकवेळा नारळ वाढविण्याचा कार्यक्रम राबविला. परंतु आजही अलिबाग-रोहा तसेच अलिबाग-रेवदंडा मार्गावरील प्रवासी खड्ड्यातून प्रवास करीत आहेत. रस्त्यावर ठिकठिकाणी खडी पडलेली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्डयातून प्रवास करताना प्रचंड त्रास प्रवाशांना होत आहे. एसटी महामंडळासह वेगवेगळी वाहने खडडयांमुळे रस्त्यात बंद पडत आहेत.
अलिबाग-सुडकोली मार्गावरील बोरघर फाट्यापासून नांगरवाडी, ताजपूर खिंडीवर मोठ्या प्रमाणात खडीचे साम्राज्य पसरले आहे. या खड्ड्यांमधून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खिंडीतील दोन्ही बाजूकडील कठडे खराब झाले आहे. त्यामुळे अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या नावाखाली सुरु असलेला कारभार धोकादायक ठरत आहे. रेवदंडा, मुरुडकडे जाणार्या पर्यटक व प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतु चौल नाका येथे असलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे.
ग्रामीण भागात प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे भूमीपूजन दळवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. परंतु आजही अनेक गावांतील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. निवडणूकीत काम करा, अन्यथा कामे दिली जाणार नाही, अशी धमकीदेखील काही मंडळींना दिली जात असल्याची चर्चा आहे. दळवींच्या या भुमिकेबाबत अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदारांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत.
रस्त्यांच्या कामांबाबत दळवींनी दिलेले आश्वासन पुर्ण न केल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे. विधानसभा निवडणूकीत जनता त्यांना जोरदार झटका देणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. परिणामी, मतदारांच्या रोषाला त्यांना सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, असेही बोलले जात आहे.