। अलिबाग । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे महिलेला गाडीखाली चिरडून पर्यटक फरार झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे.यामध्ये कॉटेज मालकालादेखील मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. रूम न दिल्याचा राग धरून त्यांनी हा प्रकार केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर बेधुंद पर्यटकांचा पर्यटनस्थळी धुडगुस होत असल्याचे उघड झाले आहे .
मिळालेल्या माहितीनुसार काही पर्यटक स्कॉर्पिओ घेऊन श्रीवर्धन येथे फिरण्यास आले.ते मद्यधुंद अवस्थेत हरिहरेश्वर दक्षिण काशी येथील एका कॉटेज येथे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आले. दारू पिऊन बेधुंद असलेल्या पर्यटकांना कॉटेजमध्ये राहण्यास कॉटेज मालकाने नकार दिला. त्याचा राग धरून या पर्यटकांनी त्यांना बेदम मारहाण करून गाडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान कॉटेज मालकाच्या बहिणीच्या अंगावरून गाडी घालून त्यांना चिरडल्याचे समोर आले आहे . अंधाराचा फायदा घेत त्यांनी तेथून पळ काढला.
ही बाब रात्री स्थानिकांच्या लक्षात आले. पलायन करणाऱ्यांपैकी एकाला पकडण्यात त्यांना यश आले.
याप्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रिकामे यांनी दिली .