बंदी झुगारुन वाहतूक सुरू
| रेवदंडा | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाने साळाव पुलावरून फक्त पाच टन वाहतुकीचा आदेश असतानादेखील काही मालवाहतूक वाहने बेशिस्तीने घुसखोरी करून पुलावरून नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येते. दरम्यान, बेधडकपणे वाहने पुलावरून नेणार्या मालवाहतूक वाहनांची घुसखोरी पोलिसांचीसुद्धा डोकेदुखी ठरत आहे.
अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरिता पुलावरून पाच टनावरील वाहतूक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केला आहे.
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने तसेच रेवदंडा-साळाव पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू करावयाचे असल्याने पुढील दोन महिन्यांकरिता या पुलावरून पाच टनावरील वाहतूक बंद करण्याचा आदेश जारी केला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रान्वये अलिबाग ते साळावदरम्यान होणारी अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले असून, त्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत सर्व वाहन चालक, ग्रामस्थ व प्रवासीवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाचे वतीने कळविण्यात आले आहे. तरीही अनेक मालवाहतूक वाहने साळाव पुलावरून बेशिस्तीने घुसखोरी करून वाहने रेवदंडाकडून साळाव-मुरूड बाजूकडे नेण्याचा प्रयत्न करताना निदर्शनास येतात. या घुसखोर वाहनचालकांना पुलावर काम करणारे कर्मचारी वाहन पुलावरून नेण्यास मज्जाव करुन वाहने माघारी पाठवित आहेत.
दरम्यान, याठिकाणी ड्युटीवर असणार्या पोलिसांसाठीसुद्धा ही डोकेदुखी ठरत आहे. शासकीय आदेश धुडकावून बिनधोकपणे पुलावरून मालवाहतू वाहने नेणार्या चालकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.