मच्छिमार सोसायट्यांच्या कारभाराची चौकशी करा

मंत्री अस्लम शेख यांची मागणी
। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास यांच्या भ्रष्ट कारभारामुळे 3 कोटी 42 लाख रुपये खर्चाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धुळखात पडला आहे. तालुक्यातील इतर बर्फ कारखाने फक्त कागदावरच अस्तित्वात असल्याचे समजते. याबाबत मत्स्यविभागाचे अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तरी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांनी सदर प्रकल्पासह तालुक्यात असलेल्या इतर बर्फ कारखाना व मच्छीमार सोसायटींच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी सामाजिक संघटनेने केली आहे.
उरण तालुक्यातील चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेसाठी राज्य सरकारने एनसीडीसी योजनेतून 30 मार्च 2009 रोजी बर्फ कारखाना आणि शीतगृह उभारण्यासाठी 3 कोटी 42 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर राजमाता विकास मच्छिमार सहकारी संस्थेने वेश्‍वी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 70 मधिल दिड एकर जमीन क्षेत्रावर बर्फ कारखाना आणि शीतगृह प्रकल्प उभारण्याचे काम मोठा गाजावाजा करत हाती घेतले. परंतु मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास यांच्या भ्रष्ट कारभारामुळे वेश्‍वी ग्रामपंचायत हद्दीत उभा राहणारा मत्स्यव्यवसायाचा बर्फ कारखाना व शीतगृह प्रकल्प गेली 12 वर्षे धुळखात पडून राहिला आहे. या प्रकल्पासाठी आलेला कोट्यवधी निधी गेला कुठे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Exit mobile version